दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या विविध गटातील सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार पं. प्रमोद मराठे यांना जाहीर झाला असून १० हजार रुपये रोख असे त्याचे स्वरुप आहे. श्री व्यंकटेश्वर सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत ज्येष्ठ कलाकारासाठी असलेला पुरस्कार ज्येष्ठ हार्मोनियम वादक राजाभाऊ पटवर्धन यांना जाहीर झाला असून १० हजार रुपये रोख असे त्याचे स्वरुप आहे.
चंद्रलेखा पुरस्कृत ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कारासाठी कांचन सोनटक्के, सुनंदा रावते पुरस्कृत नंदकुमार रावते उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी अद्वैत दादरकर, मेधा जांबोटकर, मनोरमा वागळे पुरस्कारासाठी विनोदी अभिनेत्री माधवी जुवेकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
संगीत विशारद परीक्षेत मुंबई विभागात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा ताराबाई दीक्षित पुरस्कार शिवरंजनी हेगडे व मेधा क्षीरसागर यांना दिला जाणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर लेखिका डॉ. मीना प्रभू यांच्या प्रकट मुलाखतीच कार्यक्रम होणार असून विजया जोगळेकर-धुमाळे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.