अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या दोघांची जोडी म्हणजे सुपरहीट चित्रपट हे जणू ठरलेलं सूत्र आहे. खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी पडद्यावरही जोडादाराची भूमिका बजावतात तेव्हा त्यांच्यातील ऑन स्क्री कमेस्ट्री पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. मात्र आता दीपिकाने रणवीरबरोबर चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार रणवीरबरोबर एकत्र काम करण्यासाठी दीपिकाला आलेल्या तीन चित्रपटांच्या ऑफर्स तिने धुडकावल्या आहेत. त्यासाठी तिने एक कारणही दिले आहे.
‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले आहेत. हे तिन्ही चित्रपट या दोघांच्या करियरमधील महत्वाचे चित्रपट ठरले आहेत. अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लवकरच पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यास सज्ज झाले आहेत. कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटामध्ये हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे ऑफस्क्रीन पती-पत्नी असलेली ही जोडी ऑनस्क्रीनवर देखील पती-पत्नीच्या रुपात झळकणार आहेत.
‘८३’ या चित्रपटानंतरही दीपिकाला रणवीर सोबत काम करण्यासाठी तीन दिग्दर्शकांनी ऑफर दिली होती. या चित्रपटांना दिपिकाने नकार दिला आहे. ‘खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबरोबर सतत स्क्रीनवर झळकल्यास तोच तोचपणा येईल,’ म्हणजेच ओव्हर एक्सपोजरमुळे जोडपं म्हणून आपले महत्व कमी होईल असे कारण देत दीपिकाने हा नकार कळवल्याचे समजते.
बॉलिवूडमधील चर्चेनुसार चित्रपटांमध्ये काम करतानाच या दोघांमधील नात्याला सुरुवात झाली. अनेक वर्ष एकमेंना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी लग्न केले. दीपिका आता २०२० साली ‘छपाक’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिका अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये या जोडीचा बहुचर्चित ‘८३’ या चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची म्हणजेच रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे.