चित्रपट निर्मितीमागील नक्की उद्देश काय? यावर अनेकजणांची अनेक मते आहेत. कित्येकांसाठी चित्रपटनिर्मिती ही केवळ गल्ला भरण्याचे साधन असतं, तर काहीजण त्याची कलेसारखी उपासना करतात. उद्देश एकच असला तरी मार्ग मात्र दोघांचे भिन्न असतात. दोन्ही बाजूला वाद होत असतात, पण दोघंही आपल्या मुद्दय़ांवर ठाम राहून या समांतर रेषेत आपला रस्ता चालत असतात. चित्रपटांच्या माध्यमातून कलेचा मार्ग शोधणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी एक आहेत ‘अमोल गुप्ते’.  ‘तारे जमीं पर’, ‘स्टॅनली का डब्बा’ अशा काही निवडक चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन, तसेच ‘फस गये ओबामा’, ‘कमीने’, ‘भेजा फ्राय-२’ यांसारख्या काही निवडक चित्रपटांमधून अभिनय  यामुळे ते गाजले आहेत.  पण त्यांचा प्रत्येक चित्रपट आपल्या दैनंदिन आयुष्यातील एखाद्या प्रश्नाला हात घातलेला असतो. मग तो ‘तारे जमीन पे’मधील ईशान अवस्थी असो किंवा ‘स्टॅनली का डब्बा’मधील अनाथ स्टॅनली असोत, एखाद्या सरळसोप्या कथेतून महत्त्वाच्या विषयावर हात घालण्याची त्यांची खुबी आहे. एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून प्रेक्षक आणि सिनेसृष्टीतील सगळेच अमोल गुप्ते यांच्याकडे फार अपेक्षेने पाहतात.
‘हवाहवाई’ हा त्यांचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणतात, ‘माझा मुलगा पाथरे हा साधारण साडेतीन वर्षांचा असेल तेव्हा त्याने स्केटिंग शिकण्याचा हट्ट धरला. रोज संध्याकाळी त्याला वांद्रे येथील स्केटिंग क्लासला नेऊन तिथे मी त्याला स्केटिंग करताना पाहात असे. याच दरम्यान माझी बायको दीपा तिच्या ‘निरोज् गेस्ट’ या लघुपटाच्या निर्मितीनिमित्त यवतमाळसारख्या गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होती. या प्रवासात मी आणि पाथरे तिच्याबरोबर फिरत होतो. तेव्हा माझ्या डोक्यात या चित्रपटाची कथा घोळत होती. त्यामुळे चित्रपट जरी खेळासंबंधी असला तरी त्याचा मूळ गाभा संत बहिणाबाई यांच्या ‘अरे संसार संसार’ या कवितेभोवती फिरतो आहे. आपण आयुष्यात खूप गोष्टी गृहीत धरतो, पण त्याच गोष्टी मिळवण्यासाठी कित्येकांना खूप कष्ट घ्यावे लागत असतात. हा चित्रपट त्या लोकांच्या बाबतीत सांगणारा आहे. स्केटिंग हा जरी चित्रपटाचा विषय असला तरी मूळ गाभा खूप खोल आणि विचार करणारा आहे. पण त्याच वेळी हा एक पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट आहे. हिंदी चित्रपटांत असतो तसा तब्बल चाळीस मिनिटांचा नाटय़मय शेवटही आहे.’
अमोल गुप्तेंचा चित्रपट म्हणजे मुलांचा विषय हे अगदी अविभाज्य समीकरण आहे. मुलेच का? याचे उत्तर देताना ते म्हणतात, ‘मुले का नकोत? दरवेळी आपण मुलांना, त्यांच्या प्रश्नांना गृहीत धरतो. त्यांना मतदानाचा हक्क नाही म्हणून त्यांचे बोलणे कोणी ऐकतही नाही. मग त्यांच्याविषयी कोण बोलणार? मुलांविषयी बोलताना आपण डोळे असून आंधळे असल्यासारखे वागतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे. आम्ही येथे चित्रपटाचे शूटिंगसुद्धा एखाद्या वर्कशॉपप्रमाणे करतो. मुलं त्यांच्या शाळा, अभ्यास सांभाळून येथे येतात. त्यांच्या हिशोबाने शिफ्ट होतात. उशिरापर्यंत शूटिंग टाळतोच.’ ‘चित्रपटासाठी पार्थोची निवड सहाजिकच होती. तो स्केटिंग करायचा म्हणून तर हा विषय सुचला मला. साकिब सलीम हा नवोदित पण चांगला अभिनेता आहे. त्याचं ‘बॉम्बे टॉकिज’ मधलं काम पाहून मी त्याची या चित्रपटासाठी निवड केली.’ ‘तारे जमीं पर’मधील निकुंभ सर असोत किंवा ‘स्टॅनली का डब्बा’मधील रोझी मिस, अमोल गुप्तेंचे शिक्षकांबरोबर असलेलं भावनिक नातं लपलेलं नाही, ‘माझ्यासाठी कुठल्याही क्षेत्रात गुरू हा सर्वात महत्त्वाचा आहे. तो आपला मार्गदर्शक असतो. अर्थात इतर क्षेत्रांप्रमाणे इथेही चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे शिक्षक असतात. निकुंभ सरांची जागा माझ्या आयुष्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न मी या शिक्षकांमध्ये करत असतो.’मराठी चित्रपटांवर राष्ट्रीय मोहोर उमटत असताना अमोल गुप्ते त्यापासून दूर राहणं शक्य नाही. म्हणून त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की,  ‘सध्यातरी मी एका प्रामाणिक प्रेक्षकाची भूमिका पार पाडतोय. मराठीत जब्बार पटेल, शांताराम बापूंसारख्या मातब्बर लोकांनी योगदान दिले आहे. अजूनतरी त्यांच्यापेक्षा मी खूप छोटा आहे. मराठी भाषेवर माझे प्रभुत्वही नाही. त्यामुळे अजूनतरी मराठीत येण्याचा माझा विचार नाही. अर्थात आजही मराठी चित्रपटांचा म्हणावा तसा गल्ला जमत नाही हे जरी खरे असले तरी राष्ट्रीय पुरस्कार हेसुद्धा एक प्रकारचे यशच आहे. तुम्हाला १०० कोटी क्लब छापाचे चित्रपट बनवायचे असतील तर बॉलीवूडमध्ये त्याची कमतरता नाही. पण आशयघन चित्रपट हे आपलं वैभव आहे आणि ते आपण गमावता कामा नये, असेही अमोल गुप्ते यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना आवर्जून नमूद केले.