लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता फहाद फासिल सोशल मीडियापासून दूर आहे. त्याच्याकडे स्मार्टफोन नाही, तो स्मार्टफोन वापरत नाही. फहाद तंत्रज्ञानापासून दूर असतो, याबद्दल अनेकदा त्याचे सहकलाकार बोलत असतात. फहादकडे स्मार्टफोन नसला तरी फोन मात्र नक्कीच आहे. त्याच्या या फोनची किंमत लाखो रुपये आहे.

अभिनेता विनय फोर्टने नुकताच फहादच्या फोनबद्दल खुलासा केला होता. “फहाद एक बेसिक फोन वापरतो जो अजिबात अत्याधुनिक नाही,” असं त्याने म्हटलं होतं. आता फहादचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये फहाद त्याचा मोबाइल फोन वापरत असल्याचं दिसतंय. विनयने म्हटल्याप्रमाणे, त्याचा फोन ‘स्मार्ट’ नक्कीच नाही; पण खूपच आकर्षक आहे.

दिग्दर्शक अभिनव सुंदरच्या एका चित्रपटाच्या पूजा समारंभाला फहादने हजेरी लावली. त्यावेळी फहाद फोनवर बोलताना दिसला. खरं तर फहाद फोन वापरताना दिसणं हेच खूपच दुर्मिळ आहे. फहादचा फोनवर बोलतानाचा व्हिडीओ झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याच्या फोनने लक्ष वेधून घेतले. फहाद कीपॅड फोन वापरतो. पण तो फक्त एक सामान्य फीचर फोन नाही. फहाद एक अल्ट्रा-लक्झरी फोन वापरतोय. हा फोन जवळपास दोन दशकांपूर्वी लाँच झाला होता आणि तेव्हा त्याची किंमत सुमारे ५ लाख रुपये होती, असं म्हटलं जातं.

१७ वर्षापूर्वी लाँच झाला होता फोन

सेलिब्रिटींनी वापरलेल्या गॅझेट्स आणि कपड्यांबद्दल व्हिडीओ बनवणाऱ्या कंटेंट क्रिएटर एफिन एम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यानुसार, फहाद वापरत असलेल्या फोनचे नाव Vertu Ascent Ti असे आहे. या फोनची घोषणा २००७ मध्ये झाली होती आणि तो २००८ मध्ये लाँच करण्यात आला होता. आता या मॉडेलची निर्मिती कंपनी करत नाही. या फोनच्या काही उत्कृष्ट फीचर्सपैकी एक म्हणजे त्याची प्रीमियम डिझाईन. हा फोन टायटॅनियम, नीलम क्रिस्टल्स आणि हाताने शिवलेल्या लेदरचा वापर करून बनवला आहे. लाँचच्या वेळी त्याची किंमत तब्बल ५.५४ लाख रुपये होती. आता फोनचे उत्पादन बंद करण्यात आले असले तरी तो अजूनही प्री-ओन्ड वेबसाइट्सवर १-१.५ लाख रुपयांना मिळू शकतो, असं एफिन यांनी म्हटलंय.

हिंदुस्तान टाईम्सच्या एका वृत्तानुसार, फहाद व्हर्टू असेंट रेट्रो क्लासिक कीपॅड फोन (Vertu Ascent Retro Classic Keypad Phone) वापरत असावा, ज्याची किंमत ११,९२० डॉलर्स (जवळपास सुमारे १०.२ लाख रुपये) आहे. सध्या तो अधिकृत वेबसाइटवर आउट ऑफ स्टॉक दाखवला आहे.

दरम्यान, फहाद फासिल हा भारतातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. २०२४ मध्ये त्याने ‘आवेशम’, ‘वेट्टाय्यान’, ‘बोगनविले’ आणि ‘पुष्पा २: द रूल’ सारखे हिट चित्रपट दिले. लवकरच फहादचा ‘मारीसन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.