चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार २०१९ सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (राझी )पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. तर अभिनेता रणबीर कपूरलाही सर्वोत्कृष्ट अभिनेता (संजू) म्हणून पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर या दोघांनीही एकमेकांना खास पद्धतीने शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं.
‘राझी’ या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे आलियाला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार स्वीकारत असताना आलिया भावूक झाली होती. विशेष म्हणजे यावेळी तिने दिलेल्या भाषणामध्ये चक्क रणबीरवर असलेल्या प्रेमाची कबूली दिल्याचं पाहायला मिळालं.
“मेघना, माझ्यासाठी तूच खरी हिरो आहेस. माझी राझी आहे. या चित्रपटासाठी तू प्रचंड मेहनत घेतलीस आणि विकी शिवाय तर हा चित्रपट कधी पूर्ण झालाच नसता. इतकंच नाही तर करण जोहर आणि माझे वडील तुम्ही माझे मेंटर आहात. माझ्या यशाच्या वाटचालीत मला साथ दिल्यामुळे तुमचे मनापासून आभार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे हा दिवस फक्त माझा आणि माझ्या खास व्यक्तीचा आहे, आय लव्ह यू…,”असं आलिया यावेळी म्हणाली.
आलियाप्रमाणेच रणबीरलाही पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याने प्रथम आलियाला किस केलं. त्यानंतर एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणला मिठी मारली.
मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळी उपस्थित होते. तसेच जान्हवी कपूर, रणवीर सिंग यांसारख्या कलाकारांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर करत या सोहळ्याची रंगत वाढविली.