‘खूबसूरत’ अभिनेत्री रेखा हिंदी चित्रपटात पुनरागमन करणार, अशी चर्चा गेले कित्येक दिवस बॉलिवूडमध्ये होती. किंबहूना, रेखा पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘वेलकम २’ चित्रपटातून एकत्र काम करणार, अशा वावडय़ाही उठल्या होत्या. प्रत्यक्षात, अमिताभ बच्चन आणि रेखा दोघांनीही या चित्रपटाला वेलकम केले नाही. मात्र, कोणाबरोबर जोडीने येण्यापेक्षा पुन्हा एकदा आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा ठसा उमटेल, अशीच भूमिका स्वीकारणे रेखाने पसंत केले आहे. ‘काय पो चे’ फेम दिग्दर्शक अभिषेक कपूर याच्या आगामी ‘फितूर’ चित्रपटातून रेखा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. रेखाबरोबर कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर अशी तरूण जोडी या चित्रपटातून दिसणार आहे. अभिषेक कपूरचा ‘फितूर’ चार्ल्स डिकन्स यांच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स’ कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीत ‘मिसेस हॅविशेम’ नावाची गाजलेली व्यक्तिरेखा ‘फितूर’मध्ये रेखा साकारणार आहे. मात्र, हिंदीत अवतरताना ‘मिसेस हॅविशेम’ची बेगम होणार आहे. दोन प्रेमी जीवांची कथा पुढे नेणाऱ्या बेगमची भूमिका रेखा करणार आहे.
गेले कित्येक दिवस ‘फितूर’ हा चित्रपट चर्चेत आहे. याआधी या चित्रपटात सुशांत राजपूत आणि कतरिना कैफ अशी जोडी होती. मात्र, शेखर कपूरचा ‘पानी’ हातात पडल्यानंतर सुशांत ‘फितूर’मधून बाहेर पडला. खरेतर, ‘काय पो चे’ पासून अभिषेक आणि सुशांतची चांगली जोडी जमली होती. त्यामुळे, सुशांतशिवाय हा चित्रपट करण्याची अभिषेकची तयारी नव्हती. पण, अखेरीस सामंजस्याने सुशांतला चित्रपटातून बाहेर पडण्याची परवानगी देत अभिषेकने त्याच्या जागी आदित्य रॉय कपूरची निवड केली होती.
‘फितूर’च्या निमित्ताने रेखा, कतरिना आणि आदित्य अशी वेगळी आणि याआधी कधीही एकत्र काम न केलेले कलाकार असे त्रिकूट जमून आले आहे. या चित्रपटाची तयारी पूर्ण झाली असून नुकताच त्याचा फर्स्ट लुकही सादर करण्यात आला आहे. यात आदित्य पुन्हा एकदा प्रेमिकाच्या भूमिकेत तर कतरिना पहिल्यांदाच नकारी व्यक्तिरेखेत दिसणार असल्याचे समजते. या दोघांची कथा रेखाची व्यक्तिरेखा पुढे नेणार असल्याने पुनरागमनासाठीही दमदार भूमिके चीच निवड रेखाने केली असल्याचे दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look katrina kaif to play heartbreaker rekha a begum in fitoor