तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई ३’ हा पहिला मराठी चित्रपट शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मराठीतील आघाडीची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे सलग तिसऱ्यांदा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर एकत्र आले आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई ३’मध्ये आणखीही दिग्गज कलाकार जोडले गेले आहेत. रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे.

या चित्रपटात स्वप्नील-मुक्ताने साकारलेल्या गौतम-गौरी यांच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. याविषयी दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, “मुंबई पुणे मुंबई’ला इतकं यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल उत्सुकता लागून राहिलेली आहे. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई’चे चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असे वाटले नव्हते. पण दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करत असताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवले होते. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काही बोलणे उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे.”

वाचा : रंगभूमीवर पल्लवी सुभाषची ‘खळी’

‘मुंबई पुणे मुंबई’ हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरहिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ तीन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आता ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. अशाप्रकारचा मराठीतील हा पहिलाच प्रयत्न आहे.