सर्वप्रथम ‘हम’ झळकला आणि ‘पडदाभर’ नृत्य-दृश्य सौंदर्याचा धमाका पाहून खरच ‘पैसा वसूल’ अशी प्रतिक्रिया उमटली. अमिताभने किमीची छेड काढताना सगळा अभिनय अनुभव पणाला लावला. किमीकडे अर्थात मोहक सौंदर्याचे शस्त्र होते. ते तिने व्यवस्थित चालवले. तरी दिग्दर्शक मुकूल आनंदचा हा चित्रपट रजनीकांत, गोविंदा, शिल्पा शिरोडकर, दीपा साही, डॅनी डेन्झोपा, अन्नू कपूर, कादर खान अशी कलाकार मंडळी असूनही फारसा रंगला नाही ….
तत्पूर्वी दीड दोन वर्षापूर्वीचा मेहबूब स्टुडिओतील त्याचा मुहूर्त झकास अनुभव ठरला. निर्माता रमेश शर्माने ‘हम’ चा मुहूर्त खणखणीत ठरवण्यासाठी कसलीही कसर शिल्लक ठेवली नव्हती. खर तर , त्या काळात नविन चित्रपटाच्या मुहूर्तना हजर राहण्यातही गंमत होती.