जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यापासून भारत-पाकिस्तान संबंधात सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. मात्र या तणावाच्या वातावरणातही भारतीय गायक मिका सिंग याने पाकिस्तानात जाऊन परफॉर्म केल्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. इतकंच नाही तर ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने मिकावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता अभिनेता सलमान खानवरही बंदी घालण्याची शक्यता आहे.
‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने मिकावर बंदी घातल्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी मिकासोबत काम करण्यास नकार दिला. मात्र असं असतानादेखील सलमान खान पुढच्या आठवड्यामध्ये मिकासोबत एक कार्यक्रम करणार आहे. हा कार्यक्रम अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मिकासोबत सलमानने जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाला त्याने ‘अप,क्लोज अँण्ड पर्सनल विद सलमान खान’ असं नाव दिलं आहे. सोहेल खानच्या इव्हेंट कंपनीने जॉर्डी पटेल यांच्या कंपनीसोबत या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. हा कार्यक्रम २८ ऑगस्ट रोजी हॉस्टन येथे होणार असून या कार्यक्रमामध्ये मिका सिंग हजर राहणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, “आम्ही केवळ भावेश पटेल यांच्यासोबत काम करत आहोत कारण त्यांच्यासोबत आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे. मात्र यूएसमधील काही लोकल प्रमोटरने मिकाला या कार्यक्रमामध्ये बोलावलं आहे. परंतु या कार्यक्रमामध्ये सलमान मिकासोबत कुठेच दिसणार नाहीये. इतकंच काय तर तो मिकासोबत स्टेजदेखील शेअर करणार नाही”, असं जॉर्डी पटेल यांनी सांगितलं.
“जर कलाविश्वातील कोणत्याही कलाकाराने मिका सिंगसोबत काम केलं तर त्याच्यावर बंदी घालण्यात येईल. यामध्ये मग कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि स्पॉटबॉय या साऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. यांच्यापैकी कोणीही मिकासोबत काम केलं तर त्यांच्यावर बंदी आणण्यात येईल. जर सलमानला या अशा परिस्थितीमध्ये जर मिकासोबत काम करायचं असेल तर त्याच्यावरही बंदी घालण्यात येईल”, असं ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’चे सदस्य अशोक दुबे यांनी सांगितलं.
दरम्यान, काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने आदळआपट सुरु आहे. भारताबरोबर सर्व प्रकारचे संबंध तोडण्यापर्यंतचे निर्णय त्यांनी घेतले आहेत. आक्रमकतेची भाषा करणाऱ्या पाकिस्तानकडून युद्धाचे इशारे दिले जात आहेत.