सुहास जोशी
इतिहासातील एखादी क्रांतिकारी घटना ही दृक्श्राव्य सादरीकरणासाठी मुळातच भरपूर नाटय़पूर्ण असते. त्यात नाटय़ ठासून भरलेले असते. गरज असते ती हे नाटय़ कलाकृतीत पूर्णपणे उतरवण्याची. काळाच्या पडद्याआड गेलेली घटना म्हणून ती कशी दिसते हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांनादेखील असतेच. अशा वेळी सादरीकरणात चोखपणा नसेल तर सगळीच गडबड होते. केवळ एक गाजलेली क्रांतिकारी घटना एवढेच मग त्याचे महत्त्व उरते. त्यापलीकडे ती कलाकृती फारशी भावतच नाही. असेच चाफेकर बंधूंवर बेतलेल्या ‘गोंद्या आला रे..’ या वेबसीरिजबाबत झालं आहे.
रॅण्ड या इंग्रज अधिकाऱ्याचा चाफेकर बंधूंनी केलेला वध ही या सीरिजची कथा. पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले असताना रॅण्ड यांची नेमणूक पुण्यात झाली. रॅण्ड हे मुलकी अधिकारी, पण खाक्या लष्करी. त्यांनी अतिशय कडक पद्धतीने पण त्याच वेळी जुलूमाने प्लेगवर उपाययोजना सुरू केल्याचा राग पुण्यातील अनेकांना होता. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखातून, तसेच भाषणातूनदेखील हे वारंवार दिसून आले. या सर्वाचा परिणाम पुण्यातील काही युवकांवरदेखील झाला. प्लेग तपासणीच्या नावाखाली महिलांचा छळ करणे, लैंगिक अत्याचार करणे, देवाधर्मावर हल्ला करणे, अशा कारणांनी चाफेकर बंधूंनी या सर्वावर इंग्रजांना धडा म्हणून काही तरी करायला हवे यावर खल केला. त्यातूनच मग तरुणांचं मंडळ सुरू झाले, बलोपासना वगैरे प्रकार सुरू झाले आणि रॅण्डला मारण्याचा कट शिजला. त्याप्रमाणे रॅण्डची हत्या झालीदेखील. राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सवाच्या कार्यक्रमावरून येणाऱ्या रॅण्डची शहानिशा करून त्याच्या येण्याची वार्ता देण्यासाठी ठोकलेली ‘गोंद्या आला रे..’ ही आरोळी या घटनेबरोबरच आजही सर्वाना आठवते. त्याच नावाने ही सीरिज आहे.
मात्र हे नाव देण्यात जेवढी कल्पकता दाखवली आहे तेवढी कल्पकता पुढे सीरिज पाहताना दिसत नाही. एकूणच ढिसाळपणे सर्व कारभार हाकला आहे. रॅण्डला मारणे ही घटना यामध्ये मध्यवर्ती. त्यापूर्वी रॅण्डचे अत्याचार आणि त्याच्या मृत्यूनंतर चाफेकर बंधूंना पकडेपर्यंतचा तपासाचा भाग इतकीच या सीरिजची व्याप्ती. पण त्यासाठी दहा एपिसोडमुळे कथानक प्रचंड खेचले गेले. पाच-एक भाग झाल्यानंतर तीच तीच दृश्यं जुन्या घटनेचा संदर्भ म्हणून इतक्या वेळा वापरली जातात की त्याचा कंटाळा येतो. एकोणिसाव्या शतकातील पुणे दाखवण्यासाठी अगदीच मर्यादित दृश्यांचा वापर झाला आहे. काही चित्रीकरण स्थळांचा वेगवेगळ्या पात्रांसाठी पुन:पुन्हा वापरदेखील झाला आहे. त्यामुळे मालिका पाहणे नीरस होऊन जाते. प्रत्येक दृश्यात मुख्य पात्रं सोडल्यास वातावरणनिर्मितीसाठी वापरलेल्या इतर पात्रांमध्ये कृत्रिमताच अधिक जाणवते.
मालिकेतील सर्वात कमकुवत बाजू म्हणजे स्थळ, काळाचं गणित पूर्णपणे गोंधळात टाकणारं आहे. स्थळ-काळ दर्शविण्यासाठी पडद्यावर केलेले निर्देश हे इतक्या वेळा येत असतात की त्यातून आणखीनच गोंधळायला होतं. भूतकाळ, वर्तमानकाळातील संचार मांडण्यातच पुरेसं कौशल्य वापरलेलं दिसत नाही. इतकेच नाही तर चक्कमे महिन्यातील दृश्य पार्श्वभागी पावसाळी वातावरण हे आणखीनच विसंगत करणारे ठरते.
संवादाबाबत आणखीनच गडबड झाली आहे. कैकवेळा एखादं दुसरं वाक्य येतं ते केवळ आणि केवळ काही तरी स्थापित करायचं एवढय़ापुरतंच. त्यामुळे एकूणच कथेचा ओघ तुटतो, पण त्या वाक्याचा संदर्भ नेमका काय होता हेदेखील कळत नाही. संवादात अनेकवेळा अलीकडच्या काळात रूढ झालेल्या काही शब्दांचा, संकल्पनांचा वापर अगदी हमखास खटकतो. इतिहासकाळातील कथानक आहे म्हणून संवाददेखील इतिहासकाळातलेच हवेत अशी अपेक्षा करणं अतीच होईल, मात्र किमान प्रेक्षकाला काळाची अनुभूती यावी इतपत तरी मेहनत घ्यायला हवी होती. अनेक ठिकाणी अगदीच पुस्तकी संवादामुळे पाहणं आणि ऐकणं दोन्ही त्रासदायक होते.
काही प्रमाणात जमेच्या बाजूदेखील यामध्ये आहेत, पण त्या अगदीच मर्यादित अशा. तुलनेने अनेक त्रुटी आणि अत्यंत ढिसाळ बांधणीमुळे सीरिज पाहताना कंटाळाच अधिक येतो. थोडक्यात सांगायचे तर एक चांगला विषय यामुळे वाया गेला आहे. चाफेकर बंधूंच्या या रॅण्ड घटनेवर कृष्णधवल काळात एक चित्रपटदेखील आला होता. तरीदेखील वेबसीरिजला वाव होता, पण तो पुरेसा साधता आला नाही.
गोंद्या आला रे..
ऑनलाइन अॅप – झी ५