मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस तर चार जणांच्या गंभीर दुखापतीस जबाबदार असल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यावर चालविण्यात येणाऱ्या खटल्याप्रकरणी आणखी दोघांनी सलमानची सोमवारी ओळख पटवली. त्यातील एक जण हा ज्या बारमध्ये सलमानने मद्यमान केले त्या बारचा व्यवस्थापक असून त्याने सलमानची ओळख पटवली परंतु  त्याने मद्यपान केले की नाही, हे माहीत नसल्याचे सांगत या व्यवस्थापकाने सलमानला दिलासा दिला.
सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपाअंतर्गत सलमानविरुद्ध सध्या सत्र न्यायालयात खटला सुरू असून महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात येत आहेत. त्यामुळे सोमवारीही सलमान जातीने न्यायालयात हजर झाला होता. सलमान अपघातापूर्वी जुहू येथील बारमध्ये मध्यरात्रीपर्यंत मद्यपान करीत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या बारचा व्यवस्थापक रिझवान याची या वेळी साक्ष नोंदविण्यात आली. त्याने सलमान घटनेच्या दिवशी मित्रांसोबत बारमध्ये आल्याचे सांगितले. त्याने आणि त्याच्या मित्रांनी कोणते मद्य मागवले हेही सांगितले. सलमानही हातात ग्लास होता़  परंतु ग्लासात पाण्यासारखे रंगहीन पेय होते. त्यामुळे सलमानने मद्यपान केले की नाही हे आपण सांगू शकत नाही, असे रिझवान याने सांगितल़े

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit n run bar manager identify salman khan in accident case