बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कंगना रणौतने सांगितले की, हृतिक रोशन बॉलिवूडमधल्या अनेक लोकांकडे गेला आणि तिचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. दोघंही अनेक महिन्यांपासून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत.

एका मुलाखतीत कंगनाने म्हटले की, दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये कोणी तिसरी व्यक्ती मदत करु शकत नाही. कंगना म्हणाली की, मला लोकांचे फोन यायचे. त्यांना हृतिक भेटला असल्याचे सांगत, तिच्या विरोधातले पुरावेही त्याने त्या लोकांना दाखवले. समोरची व्यक्ती मला फोन करुन माझ्याकडे याबाबतचे स्पष्टीकरण मागायची. पण मी उत्तर द्यायचे की हे तुमचं काम नाही.

सिनेसृष्टीत जर मित्र बनवले तर पुढे कधी ना कधी त्याचा त्रास होणारच. सिनेसृष्टीत तुम्ही ज्यांच्यासोबत काम करता, त्यांच्याहून जर तुम्ही यशस्वी झालात तर ते तुम्हाला दुर्लक्ष करु लागतात. हे स्वाभाविक आहे की, तुमच्यासोबत काम केलेले तुमचे सहकारी आयुष्यात यशस्वी झाले तर दुसऱ्यांना त्याचे वाईट वाटतेच. तसेच इतरांचेही आहे, जर तुम्ही यशस्वी झालात तर तेही तुम्हाला दुर्लक्षित करणार, असे कंगना आज तकशी बोलताना म्हणाली.

सध्या कंगना, ‘रंगून’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचे प्रमोशन करताना कंगना म्हणाली की, अनेकदा सिनेमाचे चित्रिकरण करताना काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे आपल्याला कळत नाही. हा तर एक मानवी स्वभाव आहे. रिलेशनशिपच्या बाबतीतही असेच आहे. तुम्हाला काय बरोबर आणि काय चूक हे कळत नाही.

कंगना पुढे म्हणाली की, माझ्या यशाचे अजून एक कारण म्हणजे सिनेसृष्टीत मी फार मैत्री करत नाही. मग ते कलाकार असो, दिग्दर्शक असो किंवा सिनेमाशी जोडले गेलेले इतर कलाकार मी कोणाशीच प्रमाणापेक्षा जास्त मैत्री करत नाही. पण सिनेसृष्टीच्या बाहेर माझे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत.

‘रंगून’ या सिनेमात कंगना १९४० दरम्यानच्या एका चित्रपट नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शाहिद या सिनेमात जमादार नवाब मलिक या भूमिकेत झळकणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या सिनेमाचे कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणींना उजाळा देणारे आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि पोस्टरमध्ये युद्धजन्य परिस्थितीचे दर्शन होत आहे. प्रेमाचा त्रिकोण दाखविणाऱ्या या सिनेमात लव्ह (प्रेम), वॉर (युद्ध) आणि डिसिट (धोका) या त्रिकोणाभोवती फिरणारे कथानक पाहायला मिळू शकते. धैर्य, गॅम्बल आणि रोमान्सची सांगड घालणारा हा सिनेमा २४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.