‘दो बदन’, ‘कर्ज’, ‘सिद्धार्थ’, ‘मेरा नाम जोकर’ आणि अन्य चित्रपटांमधून लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांना पुन्हा चित्रपटातून अभिनय करण्याची इच्छा आहे. परंतु त्यांना चित्रपटात कास्ट करणे कठीण असल्याचे अभिनेत्री सिमी गरेवाल यांना वाटते. या विषयी बोलताना त्या म्हणाल्या, मला चित्रपटात कास्ट करणे कठीण आहे. चित्रपटकर्ते मला कशा प्रकारच्या भूमिका देतील ते मला ठाऊक नाही. मला पुन्हा चित्रपटांमधून काम करायला आवडेल… अभिनयावर माझे पहिले प्रेम आहे. माझ्याकडे काही भूमिकांसाठी विचारणा होत असली, तरी त्या तितक्या आकर्षक नाहीत. मेलबर्न येथे होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत सिमी गरेवाल म्हणाल्या, चित्रपटसृष्टीत काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. ज्याप्रकारे आज चित्रपट बनत आहेत त्यात कथा सादरीकरणात आणि तांत्रिकदृष्ट्या फार मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आढळून येतात. आज विविध प्रकारचे चित्रपट बनत आहेत, आपले चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या दर्जाचे आहेत, इथे प्रत्येकासाठी भूमिका आणि विषय उपलब्ध आहे, पार्श्वसंगीत आणि संगीतातसुद्धा मोठ्याप्रमाणावर बदल झाला आहे. मेलबर्न येथील भारतीय चित्रपट महोत्सवाच्या परीक्षक मंडळाच्या सदस्या असलेल्या सिमी गरेवाल यांनी चित्रपट महोत्सवाची राजदूत विद्या बालनचे कौतुक केले. विद्या बालन विषयी त्या म्हणाल्या, ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटात तिने अतिशय छान काम केले आहे… फार कमी अभिनेत्री आहेत ज्या अशाप्रकारच्या भूमिका साकारू शकतात. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘कहानी’सारख्या विविध चित्रपटांमधून काम करण्याची तिच्यात क्षमता आहे.