दक्षिण आफ्रिकेत सुरु असणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये भारतीय संघाने पहिला सामना जिंकत दणक्यात सुरुवात केली. कसोटी मालिकेत झाल्या गेल्या सर्व गोष्टींना मागे टाकत भारताचा एकदिवसीय क्रिकेट संघ नव्या उत्साहात मैदानावर उतरला आणि दक्षिण आफ्रिका संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात अनेक क्षण महत्त्वाचे ठरले. पण, सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती म्हणजे अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहलीची शतकी भागीदारी. संयमी आणि आक्रमक असे दोन पट्टीचे खेळाडू खेळपट्टीवर असल्यामुळे क्रीडारसिकांसाठी ही पर्वणीच होती. त्यातच विराटने त्याच्या अफलातून फलंदाजीच्या बळावर ११२ धावा केल्या आणि आपल्या कारकिर्दीत आणखी एका शतकी खेळीची भर घातली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपासून विराटच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेल्याचं पाहायला मिळालं. पण, त्या साऱ्यांसाठी विराटने हे शतक ठोकत प्रत्युत्तर दिलं असं म्हणावं लागेल. त्याच्या या शतकी खेळीमुळे चाहत्यांना पुन्हा एकदा आनंद साजरा करण्याचं कारण मिळालं. या चाहत्यांमध्ये एका खास नावाचाही समावेश होता. ते नाव म्हणजे विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा. अनुष्का विराटच्या आयुष्यात जणू त्याच्या सावलीप्रमाणे साथ देत असून चित्रीकरण आणि व्यग्र वेळापत्रकातूनही वेळ काढत तिने हा सामना पाहिला आणि विराटच्या शतकी खेळीचा आनंद साजरा केला.

वाचा : विदर्भाच्या अथर्व तायडेने केली युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी

इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून अनुष्काने काही फोटो पोस्ट करत विराटचं कौतुक केलं आणि सर्वसामान्य चाहत्यांप्रमाणेच ‘What a Guy’, असं लिहित तिने विराटचे फोटो पोस्ट केले. तिचे हे फोटो पाहून पुन्हा एकदा ‘विरुष्का’ ट्रेंडमध्ये आले असणार यात वाद नाही. अनुष्काने आजवर बऱ्याच प्रसंगांमध्ये विराटची साथ दिली आहे. किंबहुना तिच्या याच स्वभाववर कर्णधार विराट भाळल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितलेही होते. डिसेंबर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकलेलं हे जोडपं अनेकांच्याच आवडीचं असून बऱ्याच प्रेमी युगुलांसाठी ते आदर्श जोडपं ठरतंय.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer virat kohli scores a century and wife bollywood actress anushka sharma put an insta story for him