|| रेश्मा राईकवार
ट्रायच्या नव्या नियमामुळे एकूणच टेलीविश्वात गोंधळाचे वातावरण आहे. आपली वाहिनी ग्राहकांच्या यादीतून बाहेर पडू नये म्हणून प्रत्येक वाहिनीने आपापल्या परीने कंबर कसली आहे. आता खऱ्या अर्थाने जो आशय चांगला तोच टीव्हीवर टिकेल आणि आशय योग्य असेल तरच प्रेक्षक तो स्वीकारतील. याआधी प्रेक्षकाच्या हातात फक्त रिमोट कं ट्रोल होता. आता त्याच्या हातात निवडीचे स्वातंत्र्य आले असल्याने साहजिकच प्रेक्षकांना बांधून ठेवण्यासाठी दर्जेदार आशय देणे ही जबाबदारी वाहिन्यांवर आली आहे. प्रेक्षक खऱ्या अर्थाने राजा बनला आहे, असे मत दिग्दर्शक, अभिनेता सतीश राजवाडे यांनी व्यक्त केले.
चित्रपट, नाटक आणि आता वाहिनीची जबाबदारी अशा तिन्ही आघाडय़ांवर कार्यरत असलेल्या सतीश यांनी आपण टेलीव्हिजनमुळेच घडलो आहोत, असं सांगितले. माझी सुरुवात टेलीव्हिजनवरून झाली. ‘ऊनपाऊस’, ‘असंभव’, ‘अग्निहोत्र’, ‘गुंतता हृदय हे’ अशा मालिका केल्या असल्याने टेलीव्हिजन माध्यमाचे तंत्र, प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे, याची पुरेपूर माहिती होती. तेव्हाही मालिका करत असताना आपला रोजचा भाग चांगला कसा होईल, यावर माझा भर असायचा. रोजच्या वीस-पंचवीस मिनिटांमध्ये प्रेक्षक आपली मालिका सोडून इतरत्र जाऊ नये, यासाठी तो तितकाच उत्कंठावर्धक बनला पाहिजे याची धडपड सुरू असायची. आता तेच गणित वाहिनीच्या बाबतीतही असल्याने तिथेही त्याच पद्धतीने काम करणार असल्याचे ते म्हणाले.
एके काळी महाविद्यालयीन काळात ७५ एकांकिका करणाऱ्या सतीश राजवाडे यांनी ‘टूरटूर’, ‘ऑल द बेस्ट’ नाटकांनंतर १९ वर्षांनी ‘द परफेक्ट मर्डर’सारखं नाटक केले आहे. मध्यंतरीच्या काळात मालिका आणि चित्रपटात अडकल्यामुळे नाटकाला वेळ देणे शक्य झाले नाही. नाटकासाठी तालमी करणे, त्याचे प्रयोग यासाठी एक वेळ द्यावा लागतो. आता तो वेळ हातात असल्याने इतक्या वर्षांनी हे नाटक करणे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुळात माझा एकांकिका ते व्यावसायिक नाटकाचा प्रवेश हा विनोदी भूमिकेमुळे झाला होता. इतक्या वर्षांत ‘एक डाव धोबीपछाड’ हा एकच विनोदी चित्रपट केला, याची आठवण के ल्यानंतर विनोदी चित्रपट करण्यासाठी आपले हात शिवशिवतात, असं ते म्हणाले. त्यांचा पहिला चित्रपट ‘मृगजळ’ प्रदर्शित झाला, त्याला पुरस्कार मिळाले. मात्र त्यानंतर ठरावीक पद्धतीच्याच चित्रपट करण्याविषयी प्रस्ताव आले होते. त्या वेळी साडेचार र्वष मी काहीही काम केलं नाही. माझ्या घरचे त्या काळात माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यानंतर संजय सूरकरांनी मला ‘ऊनपाऊस’ मालिकेच्या एका भागाच्या दिग्दर्शनाविषयी विचारले होते. मी त्यांना कामाची गरज आहे, असं सांगितलं आणि मग ‘ऊनपाऊस’ सुरू झाली, ती संपता संपता ‘असंभव’ मालिकेविषयी विचारणा झाली. ‘असंभव’चा बाज वेगळा होता. त्यानंतर मग ‘गैर’सारखा थरारपट केला, पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. चित्रपटापेक्षा मालिकांमध्ये हा जॉनर जास्त यशस्वीपणे करता येतो, हे लक्षात आल्यानंतर मग ‘अग्निहोत्र’मध्येही त्याच पद्धतीने काम केले. उत्कंठावर्धक मालिका आणि ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटानंतर नातेसंबंधावरचे चित्रपट, प्रेमकथा करण्यात इतका गुंतलो, की इतर जॉनर करताच आले नाहीत, असंही त्यांनी सांगितले.
‘एक डाव धोबीपछाड’चं श्रेय मात्र ते अशोक सराफ-निवेदिता सराफ यांना देतात. त्यांनी मला हा चित्रपट करण्याविषयी विचारलं तेव्हा मी विनोदी चित्रपट केलेला नाही. तुम्ही माझी निवड कशी काय केली, हे अशोक सराफ यांना विचारलं. तेव्हा त्यांनी मला खूप छान उत्तर दिलं. ते म्हणाले, तू विनोदी चित्रपटात काम केलं आहेस. तुला विनोदाची उत्तम जाण आहे आणि दिग्दर्शक म्हणून तुझं तंत्र चोख आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे इतक्या मोठय़ा कलाकारांना घेऊन मी तो चित्रपट करू शकलो, असं ते म्हणाले. आताही नव्या चित्रपटासाठी लिखाण सुरू आहे. त्याचबरोबरीने वाहिनी आणि नाटक सुरू आहे. एकाच वेळी तिन्ही माध्यमांतून कार्यरत असल्याचा फायदाच जास्त होतो. कारण सतत वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रेक्षकांपर्यंत काही तरी घेऊन पोहोचत असतो.
सध्या ट्रायच्या नव्या नियमांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. प्रेक्षकांकडे निवडीचा अधिकार असल्याने वाहिन्यांमध्येही अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यात डिजिटल मनोरंजन विश्वाचीही स्पर्धा टेलीव्हिजनला जाणवते आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, केवळ तंत्रात बदल झाला आहे असं नाही, तर प्रेक्षकांच्या मानसिकतेतही बदल झाला आहे. आधी प्रेक्षकांकडे संयम जास्त होता. एक तर त्या वेळी त्यांच्याकडे मनोरंजनाचे फारसे पर्याय नव्हते. आता त्यांच्यासमोर इतके पर्याय आहेत, की हा नाही आवडला तर झटक्यात दुसरा इतक्या पटापट त्यांची निवड बदलते. त्यामुळे प्रेक्षक ज्याच्याशी जोडले जातील असे मनोरंजन दिले नाही तर ते दुसरीक डे जाणारच.
डिजिटलला ज्या पद्धतीने सबस्क्राइब करून ते पाहावं लागतं, तसंच टीव्हीवरही आता प्रेक्षक आपल्याला आवडणारी वाहिनी सबस्क्राइब करणार आहेत, निवडणार आहेत हाच महत्त्वाचा बदल असल्याचे तो सांगतो. माध्यम कुठलेही असले तरी प्रेक्षकाला बांधून ठेवेल, अशी आशयनिर्मिती हेच सध्याच्या कलाकार, दिग्दर्शक प्रत्येकासमोरचे आव्हान असणार आहे, हे त्यांनी ठामपणे सांगितले.
सगळ्याच मालिका हिट होऊ शकत नाहीत. मात्र सर्वसाधारणपणे त्यांना जोडून घेऊ शकेल, असा चांगला, सशक्त आशय देणं ही आजची गरज आहे. त्यातही मराठी प्रेक्षक हे अधिक चोखंदळ आहेत. त्यांना सगळीकडे जे दाखवलं जातं तेच मराठीतही पाहण्यात रस नसतो. त्यामुळे आपल्या मराठी वाहिन्यांवर वेगळं काही मिळालं तर ते नक्की पाहतील.
‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम पाहायचे तर प्रेक्षकांना भ्रमणध्वनी किंवा लॅपटॉपवर त्याची निवड करावी लागते. दूरचित्रवाणीचं तसं नाही. तो कायम घरात असतो, त्यामुळे तो केव्हाही पाहिला जातो. शिवाय, टीव्हीचा संस्कार प्रेक्षकांवर झालेला आहे. अनेक जुन्या मालिका लोकांना आजही आठवतात. त्या वेळी तर मालिका आठवडय़ातून एकदा दाखवल्या जात, तरीही त्यांचा प्रभाव लोकांवर आजही राहिलेला आहे. त्यामुळे हे माध्यम सगळ्यात जास्त प्रभावी माध्यम आहे. – सतीश राजवाडे