नवीन सेलिब्रिटी दाम्पत्य अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने त्यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांसाठी दिल्लीतील हॉटेल ताजमध्ये काल रिसेप्शन ठेवले होते. आपल्या आवडत्या जोडीची एक झलक टिपण्यासाठी त्यांचे चाहते आणि प्रसारमाध्यमं बरीच उत्सुक होते. त्यांची ही उत्सुकता शिगेला टांगल्यानंतर विरुष्काने अगदी शाही अंदाजात रिसेप्शनच्या ठिकाणी एण्ट्री केली. ११ डिसेंबरला इटलीतील टस्कनी येथे विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याच्या चेहऱ्यावर एकमेकांवर असलेले प्रेम स्पष्ट दिसून येत होते. एका जंटलमनप्रमाणे विराटने आपल्या पत्नीला स्टेजवर चढण्यासाठी हात पुढे करत त्याचे अनुष्कावर असलेले प्रेम पुन्हा दाखवून दिले.

वाचा : मार्च २०१८ पर्यंत करावी लागणार ‘पद्मावती’ची प्रतिक्षा?

या रिसेप्शनला कोहली आणि शर्मा कुटुंबाव्यतिरीक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. क्रिकेटपटूंमध्ये सुरेश रैना, शिखर धवन, गौतम गंभीर हे विरुष्काला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते.

गायक गुरुदास मान याच्या गाण्याने या रिसेप्शन सोहळ्याला अधिकच रंगत आली होती. पंजाबी गाण्यांचा कट्टर चाहता असलेला विराट यावेळी स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने लगेच गाण्यावर ठेका धरण्यास सुरुवात केली. आपल्या पतीसोबत नाचण्याचा मोह यावेळी अनुष्कासुद्धा आवरू शकली नाही. मग काय तिनेही नाचण्याचा मनमुराद आनंद लुटत क्रिकेटपटू शिखर धवनसोबत शाहिदच्या ‘मौज है मौजा’ गाण्यावर ठेका धरला.

वाचा : या शर्यतीत विराटने किंग खानलाही मागे टाकलं

लाल रंग हा प्रत्येक नवविवाहितेसाठी फार महत्त्वाचा असतो. त्यामुळेच अनुष्काने लाल आणि सोनेरी रंगाची सब्यासाचीने डिझाइन केलेली साडी नेसली होती. वजनदार आणि जडाऊ दागिने, केसात मोगऱ्याचा गजरा यामुळे अनुष्काच्या सौंदर्यात अधिकच भर पडली होती. विशेष म्हणजे यावेळी तिने भांगेत भरलेल्या कुंकूने सर्वांचे अधिक लक्ष वेधले. विराटने काळ्या रंगाची अचकन, पांढरा चुडीदार आणि त्यावर नक्षीकाम केलेली शाल घेतली होती.