योगविद्येला नेहमीच बऱ्याच जणांनी अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. योगविद्या ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या धकाधकीच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. कामाच्या व्यापात शारीरिक स्वास्थ्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं आणि त्याचा त्रासही आपल्याला सहन करावा लागतो. पण, या सर्व गोतावळ्यामध्ये अवघे काही क्षण योगसाधना केल्याचा आपल्याला फायदाच होतो. अशा या योगसाधनेपासून सेलिब्रिटीही मागे नाहीत.

तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा जगभरात उत्साह पाहायला मिळत आहे. याच उत्साहात सहभागी होत अभिनेत्री शिल्पा शे्टटी आणि बिपाशा बासूने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत. डस्की ब्युटी बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन करण सिंग ग्रोवरसोबत योगा करतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये बिपाशा- करण कठिण आसनं करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक फोटोला तिने साजेसं कॅप्शनही दिलंय. बी- टाऊनमध्ये विविध परिंने योग दिवस साजरा केला जात असतानाच अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेसुद्धा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

‘बकासन’ हे कठिण आसन करत शिल्पाने हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये बऱ्याच प्रयत्नांनंतर हे आसन जमल्याचा तिने व्यक्त केला आहे. तसं पाहायला गेलं तर योगसाधना ही काही सोपी गोष्ट नाही. पण, त्याप्रती असणारी निष्ठा आणि ओढ यांच्या साथीने योगविद्येत पारंगत होता येतं ही बाब सर्वमान्य आहे.

शिल्पा, बिपाशाप्रमाणेच अभिनेत्री दीपिका पदुकोण, उर्मिला मातोंडकर, लारा दत्ता, मलायका अरोरा, करिना कपूर या अभिनेत्री आणि काही अभिनेतेसुद्धा योसगाधनेला प्राधान्य देतात.