पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गडचिंचले येथे जमावानं तीन साधूंची हत्या केली होती. अशीच काहीशी घटना आता उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडली आहे. तेथील एका साधूंवर जमावाने लाठी हल्ला करत त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने संताप व्यक्त केला आहे. “निर्दोष संतांच्या हत्या थांबल्या नाही तर तुम्हाला शाप लागेल” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

“भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या आणखी एका साधुंची जमावाने हत्या केली. या निरपराध अध्यात्मिक साधकांची हत्या थांबविली नाही तर आपण दु:ख भोगत राहू. देशात शांती टिकणार नाही.” अशा आशयाचे ट्विट करुन कंगनाने आपला राग व्यक्त केला आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

कंगना रनौत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती बिनधास्त प्रतिक्रिया देत असते. यापूर्वी तिने सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूवरुन बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला होता. “सुशांत इतका कमकूवत नव्हता. तो लढवय्या प्रवृत्तीचा होता. इंजिनियरींमध्ये पहिला क्रमांक पटकावणारा सुशांत मेंदूने कमकूवत कसा असू शकतो?बॉलिवूडमधील काही लोकांनी आत्महत्येचा विचार त्यांचा मेंदूमध्ये रुजवला. त्याने आत्महत्या केली नसून त्यासाठी त्याला प्रवृत्त करण्यात आले होते. नियोजनबद्ध पद्धतीने त्याची हत्या झाली.” असा आरोप कंगनाने केला होता.