अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचणाऱ्या ‘कांतारा’ चित्रपटाची चर्चा अजूनही सुरूच आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगभरातील प्रेक्षकांवर गारुड केलं आहे. जगभरात या चित्रपटाने ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी सध्या त्याच्या ‘कांतारा’ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. या चित्रपटामुळे रिषभ शेट्टीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्याला आता विविध भाषिक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. मात्र त्याने हे चित्रपट करण्यास थेट नकार दिला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने यावर सविस्तर उत्तर दिले.
नुकतंच ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने ‘टाइम्स नाऊ समिट २०२२’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेता रिषभ शेट्टी यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी चित्रपटसृष्टी, कांताराचे शूटींग, कांतारा कसा हिट ठरला, बॉयकॉट बॉलिवूड याबद्दल भाष्य केले. यावेळी रिषभ शेट्टीला ‘तू एक उत्तम अभिनेता आहेस तर तुला हिंदी किंवा इतर भाषिक चित्रपट करायला आवडतील का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट भाषेत ‘अजिबात नाही’ असे सांगितले.
आणखी वाचा : ‘कांतारा’ चित्रपटातील अभिनेत्याला ‘भूत कोला’ परंपरेवर वादग्रस्त विधान करणं भोवलं, गुन्हा दाखल
रिषभ शेट्टी काय म्हणाला?
“अजिबातच नाही. मला कायम कन्नड चित्रपटच करायचे आहेत. कारण मला कन्नड चित्रपटसृष्टीने एक अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून व्यासपीठ दिले आहे. आज मी इथे जो काही आहे त्याचे कारण कन्नड भाषिक प्रेक्षक. आज कांतारा हा जर हिट झाला असेल तर त्याचे एकमेव कारण म्हणजे कन्नड प्रेक्षक आणि कन्नड चित्रपटसृष्टी. त्यामुळेच मला कायम कन्नड चित्रपट करायचे आहेत.
जर एखादा चित्रपट हिंदी किंवा इतर भाषिक लोकांना आवडला तर मी त्यांच्यासाठी डब करेन आणि तो प्रदर्शित करेन. आता भाषेचा कोणताही अडथळा राहिलेला नाही. प्रेक्षक हे प्रत्येक भाषेतील चित्रपट पाहत आहेत. मी कन्नड चित्रपटसृष्टीतून आलो आहे. ती माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मला तिथेच चित्रपट करायला आवडतील”, असे रिषभ शेट्टीने म्हटले.
आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरलेला ‘कांतारा’ आता ओटीटीवर; वाचा कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट?
त्याचे हे उत्तर ऐकल्यावर अनुपम खेर यांनी त्याला मजेशीर प्रश्न विचारला. ‘जर एखादा अभिनेता कन्नड चित्रपटात काम करु इच्छित असेल तर करु शकतो का?’ असे अनुपम खेर यांनी विचारले. त्यावर त्याने ‘नक्कीच सर’, असे म्हटले. त्यावर अनुपम खेर यांनी ‘मी तेलुगू, तामिळ अनेक चित्रपट केलेत. पण एकही कन्नड चित्रपट केलेला नाही’, असे सांगितले. ‘मी तुमचा खूप मोठा चाहता आहे’, असेही तो यावेळी म्हणाला.