आपल्या विनोदांनी सर्वांना खळखळून हसवणारा विनोदवीर कपिल शर्मा याच्यावर सध्या लोकांची माफी मागण्याचीच वेळ येत असल्याचे दिसतेय. ‘द कपिल शर्मा शो’मधील त्याचा सहकलाकार सुनील ग्रोव्हर याची तो माफी मागून एक दिवस उलटत नाही तोवर लगेचच त्याच्यावर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिची माफी मागण्याची वेळ आली.
आगामी ‘बेगम जान’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता विद्या ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर गेली होती. सेटवर शूटिंगसाठी गेलेल्या विद्याने तब्बल सहा तास कपिलची वाट पाहिली. पण वेळेची कदर नसलेला कपिल नेहमीप्रमाणेच सेटवर उशिरा पोहोचला. कपिलच्या या वागण्याने विद्या प्रचंड रागावली होती. शूटिंग न करताच तिने सेटवरून निघून जाण्याचा निर्णयही घेत तिच्या गाडीत बसून परतीची वाट धरली. तितक्यातच तिला कपिलचा फोन आला की आम्ही शूटसाठी तयार आहोत. विद्या सुरुवातीला परत जाण्यासाठी तयार नव्हती. पण, तिला चित्रपटाच्या प्रसिद्धीत कोणतीही कसर बाकी ठेवायची नव्हती. तसेच, कपिलने माफी मागितल्यामुळे तिने पुन्हा सेटवर जाण्याचा निर्णय घेतला. विद्याच्या अभिनयाची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. आपल्या मनात असलेला राग चेहऱ्यावर न आणता तिने शांतपणे संपूर्ण शूट पूर्ण केले. ‘बेगम जान’मध्ये इला अरुण, पल्लवी शारदा आणि गौहर खान यांच्याही भूमिका असून त्यांनीदेखील कपिलच्या शोवर हजेरी लावली होती.
कपिलच्या उशिरा येण्याच्या सवयीमुळे शोवर येणारे सेलिब्रिटी आणि त्याचे सहकलाकार यांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. याआधी जानेवारी महिन्यात अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे ‘ओके जानू’च्या प्रसिद्धीसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये गेले होते. त्यांनाही त्याने जवळपास सहा तास ताटकळत ठेवले.
दरम्यान, सध्या कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. ऑस्ट्रेलियावरून मुंबईला येताना विमान प्रवासात कपिलने मोठ्या आवाजात सुनीलचा अपमान केला होता. तसेच, त्याच्यावर हात उगारल्याचेही म्हटले जात होते. यानंतर कपिलने सोशल मीडियावर ‘इतना तो चलता है….’ या शब्दात त्याची प्रतिक्रिया दिली होती. तसेच, त्याने सदर पोस्टनंतर सुनीलची ट्विट करून माफी मागितली होती. मात्र, या प्रकारामुळे सुनील बराच दुखावला गेला आहे. त्याने आज सकाळी एक ट्विट करून कपिलला ‘देव असल्यासारखे वागू नकोस असे म्हणत ‘हा सर्वस्वी तुझा शो असल्याची जाणीव करुन देण्यासाठी धन्यवाद. या कार्यक्रमातून कोणालाही कधीही काढून टाकण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे हेच तू दाखवून दिलेस.’, असे म्हटले.