बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वातील घराणेशाही हा मुद्दा समोर आला होता. या प्रकरणी अनेक दिग्गजांची नाव समोर आली होती. त्यातच चित्रपट निर्माता करण जोहरवर अनेकांनी कडाडून टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे २०२० या वर्षात करण जोहर सातत्याने प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला होता. परंतु, या सगळ्यामधून बाहेर पडत करणने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आली आहे.
करणने सोशल मीडियावर त्याच्या मुलांसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने मागील वर्षातील नकारात्मक गोष्टीं विसरुन पुढे जाण्याचा निर्धार केल्याचं म्हटलं जात आहे.
“माझे कुटुंब व माझे मित्र या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. ते कायम माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. तसंच माझ्या आजूबाजूच्या सर्व व्यक्तींचाही मी आभारी आहे. हे खरं आहे की, मागचं वर्ष आपल्यासाठी सोपं नव्हतं. त्या वर्षाने आपल्याला चांगला धडा शिकवला आहे. पण शेवटी विजय त्याचाच होतो जो सगळ्या अडथळ्यांना पार करुन पुढे जातो”, अशी पोस्ट करणने शेअर केली आहे.
वाचा : LGBTQ विषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर निशिगंधा वाड यांनी मागितली माफी
दरम्यान, करणच्या या पोस्टवर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी रिअॅक्ट झाले आहेत. अनेकांनी त्याच्यावर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. २०२० या वर्षात करण जोहर चांगलाच चर्चेत राहिला होता. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर करण जोहरने घराणेशाहीला पाठिंबा दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.