आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनावर राज्य करणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. नुकताच कार्तिकने त्याची आई माला तिवारी यांचा १६ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा केला. आईचा वाढदिवस आणखी खास करण्यासाठी कार्तिकने आईला स्पेशल गिफ्ट दिले आहे.
कार्तिकने आईला ‘मिनी कूपर’ कार गिफ्ट दिली आहे. या कारची किंमत तब्बल ४० लाख रुपये असून ही हिरव्या रंगाची कार आहे. कार गिफ्ट केल्यानंतर कार्तिक आणि त्याची आई दोघेही लाँग ड्रायवर जाताना दिसले होते.
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्तिकने एक जुना फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या लहानपणीच्या फोटोमध्ये कार्तिक अत्यंत क्यूट दिसत असून त्याच्या आईने त्याची छान हेअरस्टाईल देखील केली असल्याचे दिसत आहे. तसेच आईने त्याला कडेवर उचलून घेतले आहे. कार्तिकने फोटो शेअर करत ‘माझ्या आवडत्या हेअरस्टाइलिस्टला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लव्ह यू आई’ असे कॅप्शन दिले.
आईच्या वाढदिवशीच कार्तिकचा आगामी चित्रपट ‘लव्ह आज कल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. कारण खऱ्या खुऱ्या आयुष्यात सारा आणि कार्तिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.