रात्रीची वेळ होती. एकटाच बसलो होतो. माझ्या शेजारच्या टेबलावर एक कुटुंब बसले होते. त्या कुटुंबात एक छोटा मुलगा होता म्हणजे साधारण कायो ज्या वयाचा हवा होता त्याच वयाचा. मी तात्काळ माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला सांगितले, ‘‘आपल्याला आपला कायो मिळाला.’’ तो म्हणाला, ‘‘तुला वेड लागलेय. तू घरी जा आणि शांत झोप.’’ मी त्याला म्हटले, ‘‘अरे नाही. खरेच माझ्या शेजारच्या टेबलावर आहे तो मुलगा.’’ माझ्या मित्राने फोन ठेवून दिला. त्याला वाटले मी खरेच काही तरी बरळतोय; पण मी जसे त्या मुलाला बघितले; त्याचे वागणे, त्याचे बोलणे, आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या माणसांना आदर देणे. सगळे इतके चमत्कार वाटावा असे होते. चमत्कार एवढय़ाकरिताच, कारण ज्याप्रमाणे कायोची व्यक्तिरेखा होती अगदी तंतोतत तो मुलगा तसाच होता. मी ठरवले, आपण त्याला जाऊन भेटायचे; पण तेवढय़ात ते कुटुंब निघाले. मी त्यांच्या मागेमागे गेलो. पावसाळ्याचे दिवस होते. त्या मुलाचे बाबा पाìकगमधून गाडी काढत होते. तेवढय़ात मी त्या मुलाच्या आईला जाऊन भेटलो आणि स्वतबद्दलची माहिती दिली. तुमचा मुलगा आमच्या सिनेमासाठी कसा योग्य आहे ते समजावून देण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाचे नाव होते. रित्विक साहोर; पण त्यांचा असा समज झाला की, असाच कुणी तरी माणूस आहे जो फ्रॉड आहे आणि आपल्याला फसवू पाहातोय. तेवढय़ात रित्विकचे बाबा गाडी घेऊन आले. त्यांनाही हा सगळा प्रकार कळला. ते तर मला अजिबातच इंटरटेन करत नव्हते. त्यांनासुद्धा मी कुणी तरी भुरटा वाटलो. मी त्यांनासुद्धा सगळे नीट समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये वर्कशॉप असल्याचे सांगितले. रित्विकला तिकडे घेऊन येण्याची विनंती केली. माझा नंबर दिला. ते मला थँक्यू म्हणाले आणि निघून गेले. पुन्हा मला झोप नाही.
कळेच ना की आता हा उद्या येणार की नाही. मी दुसऱ्या दिवशी आतुरतेने वाट बघत होतो. माझे डोळे लागले होते ते रित्विकसाठी आणि दुसऱ्या दिवशी रित्विकचे बाबा रित्विकला घेऊन ऑफिसला आले आणि माझा जीव भांडय़ात पडला. रित्विकची ऑडिशन झाली. अप्रतिम झाली आणि आता पुढचा टप्पा समोर आला. रित्विक कधीच क्रिकेट खेळला नव्हता, त्याला क्रिकेट खेळता येत नव्हते. मग पुढचे तीन महिने त्याचे क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू झाले. अशा प्रकारे अखेर आम्हाला आमचा कायो मिळाला. कास्टिंग करता करता मला रस्त्यावर येता-जाता माणसांचे निरीक्षण करण्याची सवय लागली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील गंमत, वेगवेगळेपण मी टिपू लागलो होतो आणि त्याच सवयीमुळे मी एकदा लोकांचा मार खाताखाता वाचलोही होतो. हा किस्सा फार गमतीशीर आहे. मी जेव्हा ‘थ्री इडियट्स’साठी शर्मनची बहीण कम्मो शोधत होतो. रेल्वे स्टेशनवर एका मुलीला थांबवून मी तिला सिनेमात काम करशील का, असे विचारले होते. त्या मुलीला असे वाटले की, कुणी तरी टपोरी मुलगा आहे आणि तिची छेड काढतोय. मला काही कळायच्या आत माझ्या आजूबाजूला बरीच माणसे गोळा झाली. कसेबसे मी सगळ्यांना समजावले आणि तिकडून स्वत:चा बचाव करून निघालो. असो.. ‘फेरारी की सवारी’चे कास्टिंग तर झाले होते. कोळी समाजातील लोक शोधले होते. अगदी वरळी कोळीवाडय़ातील लोक शोधले होते. कास्टिंग अगदी ओरिजनल झाले होते. आता अभिनयाचा भाग होता, कारण या लोकांनी कधी तरी शूटिंग फक्त बघितलेले होते; पण कधी शूटिंगच्या कॅमेऱ्यासमोर आले नव्हते. त्यामुळे त्यांचे दडपण दूर करणे, त्यांच्यात सहजता येणे, त्या सहजतेनेच त्यांनी कॅमेऱ्यासमोर येणे हे माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते. आम्ही त्याचेही वर्कशॉप घ्यायचे ठरवले. रोज रात्री प्रत्येक जण आपापले काम संपवून बोटीवरून परत येऊन आवर्जून वर्कशॉपला हजर राहायचा आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही आम्हाला हवे ते आणि हवे तसे साध्य करू शकलो.
रोहन मापुस्कर – response.lokprabha@expressindia.com
@rrmapuskar
सौजन्य – लोकप्रभा