नात्यांची नवीन परिभाषा उलगडणारा आणि दोन्ही बाजू मांडणारा गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा मराठी चित्रपट १२ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे, निर्माते नितीन वैद्य, प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ, प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत मनमोकळा संवाद साधला.

आजच्या पिढीचे राहणीमान, नात्यांची व्याख्या, त्यातील संघर्ष आणि गोडवा सांगणाऱ्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे. ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री निवेदिता सराफ, सुकन्या मोने आणि संजय मोने अशी दिग्गज कलाकारांची फळी चित्रपटात आहे. तर विशेष बाब म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता उमेश कामत व प्रिया बापट तब्बल १२ वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करीत आहेत.

त्यामुळे प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याबद्दल निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितले की, ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची गोष्ट ऐकल्यानंतर एका प्रेमळ जोडीची आवश्यकता असल्याचे जाणवले आणि त्यासाठी उमेश कामत व प्रिया बापट यांच्याशिवाय उत्तम पर्याय नाही. त्यामुळे दोघांशी तात्काळ संपर्क केला, गोष्ट सांगितली आणि त्यांना कथानक आवडल्यानंतर दोघांनी होकार दिला, या चित्रपटाच्या निमित्ताने उमेश-प्रिया १२ वर्षांनी रूपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण करणे आव्हानात्मक होते, मात्र पूर्वतयारी व्यवस्थित केल्यामुळे चित्रीकरण करताना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत’.

तर उमेश-प्रिया जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र आणणाऱ्या चित्रपटाच्या कथेबाबत दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितले की, ‘आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून कल्पना सुचतात आणि कथानिर्मिती होते. सभोवतालच्या व्यक्तींचा दृष्टिकोन, विचार, समस्या आणि त्यांच्यासोबतच्या चर्चेतून विविध गोष्टींची जाणीव होते. प्रत्येकाची वेगळी बाजू असते. आपण नात्यांकडे कसे पाहतो? दोन्ही बाजू कळायला हव्यात, या दृष्टीने ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची मांडणी केली आहे’.

‘काही वर्षांपूर्वी मी आणि प्रिया एकत्र काम करीत होतो. प्रियाला विचारल्यानंतर उमेशला घ्यावेच लागेल, असे वाटून दिग्दर्शक- निर्मात्यांची गडबड व्हायला नको. त्यामुळे आम्ही ठरवून एकत्र काम करीत नव्हतो. काही वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करण्याची इच्छा झाली आणि प्रेक्षकांकडूनही विचारणा होऊ लागली. पण शोध सुरू केल्यानंतर अपेक्षित काहीच मिळत नव्हते.

आता १२ वर्षांनंतर आदित्य व नितीन एक गोष्ट घेऊन आले. या गोष्टीत दोन वेगवेगळ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कलाकार, भाषा आणि विषय एकंदरीत सर्वच गोष्टी उत्तम आहेत. या चित्रपटात मराठी चित्रपटासाठी आवश्यक सर्व गोष्टी असल्यामुळे आम्ही होकार दिला. तसेच चित्रीकरणादरम्यान मजाही केली. एकंदरीत ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी पाहण्यासारखा आहे’, असे उमेश कामत यांनी सांगितले.

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत बहुसंख्य चित्रपटांची निर्मिती होत आहे. अनेकदा एकाच दिवशी दोन ते तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे एकमेकांमध्ये स्पर्धा रंगलेली पाहायला मिळत आहे. परिणामी अनेक मराठी चित्रपटांना अपेक्षित आर्थिक यश साधता आलेले नाही. त्यामुळे मराठी निर्मात्यांनी एकमेकांशी समन्वय साधून प्रदर्शनाच्या तारखांबाबत चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या परिस्थितीबद्दल निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितले की, ‘सध्या मनोरंजनसृष्टीतील स्पर्धा वाढली असून आव्हानात्मक काळ आहे आणि लोकांच्या आवडीनिवडी बदलल्यामुळे करोनानंतरचा काळ अधिकच आव्हानात्मक आहे. मनोरंजनसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळे आम्ही निर्माते व दिग्दर्शक म्हणूनही थोडेसे चाचपडतो आहोत.

सध्या लोकांना लाइव्ह कार्यक्रम पाहायचे आहेत. त्यामुळे लोकांची आवडनिवड पाहून चित्रपटाची निर्मिती करीत आहोत. कोणत्याही चित्रपटाशी विशेषतः मराठी चित्रपटांची एकमेकांशी टक्कर व्हायला नको, या दृष्टीने आम्ही नियोजन केले होते. त्यामुळे विविध चित्रपटांच्या तारखा पाहून ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली.

परंतु सध्या चित्रपटाची निर्मितीच मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे प्रेक्षकांपुढे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे प्रेक्षक स्वतःच्या आवडीनुसार चित्रपट पाहतात’. तर निवेदिता सराफ यांनी सांगितले की, ‘पूर्वीच्या काळातही मोठ्या प्रमाणात चित्रपटांची निर्मिती व्हायची. बहुपडदा चित्रपटगृहांचा काळही नव्हता, एकपडदा चित्रपटगृहांची संख्याच जास्त होती. मात्र तेव्हा निर्माते एकमेकांशी बोलायचे आणि एकमेकांच्या चित्रपटांमध्ये टक्कर होत असल्यास प्रदर्शनाच्या तारखांमध्येही बदल व्हायचा. सध्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी कसोटीचा काळ सुरू आहे. स्पर्धा वाढली आहे, चित्रपटगृहात अपेक्षित स्क्रीन्स मिळत नाहीत. त्यामुळे निर्मात्यांनी एकमेकांशी समन्वय साधून प्रदर्शनाच्या तारखांबाबत चर्चा केली पाहिजे’.

प्रत्येक व्यक्तिरेखेचे महत्त्व व मांडणी सुस्पष्ट

कोणताही चित्रपट करताना एक कलाकार म्हणून आनंद वाटणे महत्त्वाचे आहे. स्वतःच्या पात्राच्या पलीकडे गोष्टही आवडली पाहिजे, एक प्रकल्प म्हणून ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाचे कथानक छान होते. लंडनमध्ये चित्रीकरणाची उत्तम सोय केल्यामुळे सुरळीतपणे चित्रीकरण पार पडले. तसेच एक दिग्दर्शक म्हणून आदित्य इंगळेच्या डोळ्यांसमोर संपूर्ण चित्रपट होता. नेमके काय करायचे आहे, यासंदर्भातील सर्व गोष्टी दिग्दर्शकाला माहीत असल्यामुळे आमचे काम सोपे झाले. सर्व व्यक्तिरेखा उत्तम लिहिल्या आहेत.

अशोक नेहमी म्हणतात की चित्रपटातील पात्राची लांबी-रुंदी आणि संबंधित पात्राच्या वाट्याला किती प्रसंग आहेत, हे बघण्यापेक्षा संबंधित पात्राचे कथेतील महत्त्व पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे कथेत पात्राचे महत्त्व असल्यास, पात्राचे मतही असणार आणि संबंधित पात्राची बाजू प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. याप्रमाणे ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटात प्रत्येक व्यक्तिरेखेचे महत्त्व आहे आणि चित्रपटाच्या शेवटी प्रत्येक व्यक्तीचा प्रवास पूर्ण झाल्याचे कळते. आमच्यासह सर्वांच्या भूमिका सुस्पष्ट असून दोघांनाही उत्तम न्याय दिला गेला आहे, तसेच हा चित्रपट जेवढा लिहिला गेला आहे, तेवढा चित्रित केला आहे आणि जेवढा चित्रित झाला आहे, तेवढा ठेवला आहे, असे निवेदिता सराफ यांनी सांगितले.

जबाबदारीची मूल्ये जपणारा चित्रपट…म्हणून होकार दिला

उमेश आणि मला एकत्र विचारले होते. ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाचे वाचन करतानाच सांगितले होते की, तुमच्या दोघांपैकी एकही जण नाही बोलला तर चित्रपट पुढे सरकणार नाही. आम्ही सध्या रंगभूमीवर करीत असलेली नाटके आजच्या पिढीला आपलीशी वाटणारी असून आजच्या काळाला जोडणारी आहेत. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटनांचे रिप्रेझेंटेशन झाले पाहिजे आणि दोन्ही बाजू मांडणारी कथा असणाऱ्या चित्रपटात काम केले पाहिजे, ही एक कलाकार म्हणून आम्हा दोघांची भूमिका आहे. दिग्दर्शकाला नेमके काय पोहोचवायचे आहे? हे महत्त्वाचे आहे. हा चित्रपट जबाबदारीची मूल्ये जपणारा, पण तरीही आजच्या काळातील चित्रपट आहे. ही गोष्ट आणि त्यातील पात्रे भावली, त्यामुळे आम्ही दोघांनी चित्रपट करण्यास होकार दिला आणि तब्बल १२ वर्षांनंतर एकत्र काम करण्याचा योग आला, असे प्रिया बापट यांनी सांगितले. (शब्दांकन : अभिषेक तेली)