मुंबई : श्रीमंत व उच्चभ्रू लोकांच्या नीतिमत्तेविषयीच्या संकल्पना आणि त्यांचे सामान्य जनतेशी असलेले वर्तन या संदर्भात वास्तवदर्शी पद्धतीने भाष्य करण्याचा प्रयत्न सिम्मी जोसेफ व रॉबिन वर्गिस दिग्दर्शित ‘रीलस्टार’ या मराठी चित्रपटात करण्यात आला आहे. ‘रीलस्टार’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या चित्रपटाच्या चमूतील ६० ते ७० टक्के तंत्रज्ञ हे केरळचे आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ, अमेरिकी निर्माते आणि महाराष्ट्रातील कलाकार असा अनोखा संगम ‘रीलस्टार’ चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे.
‘रीलस्टार’ चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला लेखक, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञांनी हजेरी लावली होती. हा चित्रपट १७ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे. जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथेला अनुकूल असलेली हृदयस्पर्शी गाणी हे चित्रपटाचे आकर्षण आहे. ‘दृश्यम’ या गाजलेल्या मल्याळम चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक विनू थॉमस यांनी गुरू ठाकूर आणि मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतबद्ध दिले आहे. चित्रपटातील पाच गाणी आदर्श शिंदे, मनीष राजगिरी, रोहित श्याम राऊत, अभिजित कोसंबी, सायली कांबळे आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी गायली आहेत.
‘मला ‘रीलस्टार’ चित्रपटाच्या निमित्ताने वेगळ्या साहसी दृश्यांचा अनुभव घेता आला. दिग्दर्शक सिम्मी व रॉबिन अनोख्या पद्धतीने प्रसंग समजावून सांगायचे, त्यामुळे दोघांकडून भाषेची अडचण जाणवली नाही. केरळमधील लोकांनी एकत्र येऊन मराठी चित्रपटसृष्टीत काम करणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. हा मराठी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा अनोखा संगम आहे’, असे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांनी सांगितले.
‘मी आणि रॉबिनने एकत्र येऊन १३ वर्षांपूर्वी मल्याळम भाषेत एका माहितीपटाची निर्मिती केली होती. आम्ही एकाच गावातील असल्यामुळे विविध विषयांवर एकत्र चर्चा करायचो आणि चित्रपट निर्मितीची स्वप्ने पाहायचो. त्यानंतर वैभवशाली मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आम्ही प्रचंड मेहनत घेऊन ‘रीलस्टार” चित्रपटाची निर्मिती केली आहे. ही खूप मोठी प्रक्रिया होती आणि या प्रवासात अनेकांनी मदत केली’, असे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी सांगितले. तर दिग्दर्शक रॉबिन वर्गिस म्हणाले, ‘मला हिंदी व मराठी भाषा बोलायला जमत नाही, पण चित्रपटाची फक्त ‘दृश्यभाषा’ असते. मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिभावान कलाकार आहेत. या सर्व मंडळींनी उत्तम सहकार्य केले’.
कलाकारांची मांदियाळी… ‘रीलस्टार’ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक, भूषण मंजुळे, मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जगताप, रुचिरा जाधव, स्वप्निल राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन अशा कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट सुधीर कुलकुर्णी यांनी लिहिला आहे. रंगभूषा भागवत सोनावणे यांनी, तर राणी वानखडे यांनी वेशभूषा केली आहे. प्रॉडक्शन डिझाइन राहुल शर्मा आणि समीर चिटणवीस यांनी केले आहे. या चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते महेंद्र पाटील आहेत आणि मुख्य सहयोगी दिग्दर्शक नंदू आचरेकर आहेत. दीपक पांडे हे कास्टिंग डायरेक्टर आणि रोहित कुलकर्णी असोसिएट डायरेक्टर आहेत.