मराठी सिनेसृष्टीत अस्सल मातीतल्या इरसाल विनोदाने दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या दादा कोंडके यांनी आपल्या नावाप्रमाणे मराठी सिनेविश्वात खऱ्या अर्थाने दादागिरी गाजवली. दादांनी जरी मराठी सिनेमासृष्टीत एक काळ गाजवला असला तरी दादांचे बालपण अत्यंत कष्टात आणि संघर्षात गेले. बागडण्याच्या वयात दादांना अनेक गोष्टींसाठी मनाला मुरड घालावी लागली, पण रडत बसण्यापेक्षा हसत आणि हसवत राहण्याचा मंत्र दादांनी जपला. पण दादा कोंडके यांचं खरं नाव दादा नाही तर वेगळंच होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका गिरणी कामगाराचा मुलगा ते यशस्वी अभिनेता, दिग्दर्शक ही ओळख दादांनी त्यांच्या जिद्दीच्या जोरावर कमावली. मराठी चित्रपटातील विनोदाचा सम्राट अशी त्यांची ओळख होती. बॉलिवूडमधील नायकच नव्हे तर खलनायकही दादांच्या अभिनयावर फिदा होते. दादा कोंडके यांचा जन्म मुंबईतल्या नायगावात कृष्णाष्टमीला झाला. ८ ऑगस्ट ही त्यांची जन्मतारीख. साहजिकच आईवडीलांनी बाळाचे नाव कृष्णा ठेवले. पण या नावाने त्यांना आई-वडिलांनी किंवा चाहत्यांनी कधीही हाक मारली नाही.
आणखी वाचा : “त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू नये म्हणून…” शक्ती कपूर यांनी सांगितला दादा कोंडकेंचा किस्सा, म्हणाले “देवाने अशी माणसं…”

दादांचा जन्म झाला तेव्हापासून त्यांची शरीरयष्टी किरकोळ होती. दिवस उजाडला की काही ना काही कारणाने हा छोटा कृष्णा आजारी पडायचा. दादांच्या भावाचे आरोग्यही फार काही चांगले नव्हते. लहानग्या कृष्णाची आई काळजीत पडली. गिरणी कामगार असलेल्या वडिलांनाही काही सुचेना. मग कुणीतरी त्यांना सांगितले की मुलाला नावाने हाक मारू नका. त्याला तात्या, सोन्या, दादा, आण्णा असं काहीतरी नाव द्या.

मुलाच्या काळजीपोटी मग त्याला कृष्णाच्या ऐवजी दादा अशी हाक मारली जाऊ लागली आणि हेच नाव त्यांच्यासोबत आयुष्यभर राहिलं. नायगावात दादांचं बालपण गेलं. वाद्याची आवड होती, त्यातूनच एका बँड पथकात दादांची कलाकारी बहरली. त्यानंतर राष्ट्रसेवादलाशी संपर्क आला आणि त्यातून त्यांना अभिनय, गाणं या कलेचा सूर सापडला.

आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

त्यानंतर पुढे भालजी पेंढारकर यांनी दादांमधील अभिनय गुण ओळखले आणि त्यांना ‘तांबडी माती’ या सिनेमात भूमिका करण्याची संधी दिली. हा सिनेमा फार चालला नाही पण दादांना अभिनयाची नस सापडली. दादांनी स्वतः ‘सोंगाड्या’ या सिनेमाची निर्मिती केली. त्यानंतर दादा कोंडके आणि सिनेमाचा रौप्य महोत्सव हे समीकरण कायमचं जोडले गेलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor dada kondake real name stroy know why he called dada nrp