Mumbai Pune Mumbai part 4 Announcement : लोकप्रिय मराठी चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांची लाडकी जोडी स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे पुन्हा एकदा परतणार आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या पुढच्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर मुंबई पुणे मुंबई ४ च्या घोषणेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये चौथ्या भागाबद्दल माहिती देण्यात आली आहे.
१५ वर्षांपूर्वी सुरू झाला एक रोमँटिक प्रवास…
मुंबई पुणे मुंबई
मुंबई पुणे मुंबई २
मुंबई पुणे मुंबई ३
ती सध्या काय करते, प्रेमाची गोष्ट, ऑटोग्राफ, मुंबई पुणे मुंबईचा दिग्दर्शक परत घेऊन येतोय, तुमची आवडती सुपरहिट जोडी. नात्यांचा गोडवा वाढवायला, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे.
मुंबई पुणे मुंबई ४, असं या व्हिडीओत लिहिलेलं दिसतंय.
सतिश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई ४ या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया व अमित भानुशाली करणार आहेत. मराठीतील पहिला फ्रेंचायजी चित्रपट ज्याचा चौथा भाग येतोय, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
आधीचे तीन चित्रपट व कथा
- १. मुंबई पुणे मुंबई (२०१०)
दिग्दर्शक: सतीश राजवाडे
मुख्य कलाकार: स्वप्नील जोशी (गौतम), मुक्ता बर्वे (गौरी)
कथा-
मुंबईची मुलगी गौरी आणि पुण्याचा मुलगा गौतम एकमेकांना भेटतात. सुरुवातीला मतभेद, टोमणे आणि वाद होतात, पण नंतर त्यांना प्रेमाची जाणीव होते. या चित्रपटातील हलके-फुलके संवाद प्रेक्षकांना फार भावले होते. त्याचबरोबर यातील गाणीही खूप गाजली होती.
- २. मुंबई पुणे मुंबई २ (२०१५)
दिग्दर्शक: सतीश राजवाडे
मुख्य कलाकार: स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे
कथा :
दुसऱ्या भागात कथा पुढे सरकते. गौरी आणि गौतम लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. दोन वेगळ्या संस्कृती आणि कुटुंबिक पार्श्वभूमी यांच्यावरून त्यांच्या नात्याची परीक्षा होते. पहिल्या भागापेक्षा हा चित्रपट अधिक कौटुंबिक आणि भावनिक होता.
- ३. मुंबई पुणे मुंबई ३ (२०१८)
दिग्दर्शक: सतीश राजवाडे
मुख्य कलाकार: स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे
कथा :
गौरी आणि गौतम आता लग्नानंतर आई-बाबा होणार असतात. गर्भावस्थेतील भावनिक प्रवास, छोट्या गोष्टींमधील आनंद आणि जबाबदारीचा गोड गोंधळ दाखवला आला होता. आता चौथ्या भागात गौरी व गौतम यांच्या नात्याचा प्रवास पुढे सरकताना पाहायला मिळेल.
