Sachin Pilgaonkar मराठी चित्रपटसृष्टीतला अजरामर विनोदी चित्रपट कुठला? असा प्रश्न विचारला तर सगळ्यांच्या तोंडी एकच नाव येईल ते म्हणजे अशीही बनवाबनवी या चित्रपटाचं. अशोक सराफ, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत, निवेदिता सराफ, सुप्रिया, विजू खोटे, अश्विनी भावे, प्रिया अरुण अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. या चित्रपटाला ३५ हून अधिक वर्षे झाली आहेत तरीही हा चित्रपट अनेक पिढ्यांचं मनोरंजन करतो आहे. या चित्रपटाची कथा वसंत सबनीस यांनी लिहिली होती. दरम्यान चित्रपटाची दिग्दर्शन करणारे सचिन पिळगावकर यांनी आपण या सिनेमाचं स्क्रिप्ट लिहिलं होतं असं म्हटलं आहे.
काय म्हणाले सचिन पिळगावकर?
सचिन पिळगांवकरांनी सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकेसोबतच सिनेमात आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं. सिनेमातील डायलॉग्स मी लिहिलेले असं सचिन पिळगांवकरांनी सांगितलं. ते म्हणाले की, ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातले मोजून तीन डायलॉग सेटवर बोलले गेले असतील. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिले होते. वसंत सबनीस आणि मी एकत्र बसून ती स्क्रीप्ट लिहिली होती.
अशीही बनवा बनवी चित्रपटातले तीनच संवाद उत्स्फुर्तपणे सुचलेले
“अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातले तीन डायलॉग सेटवर बोलले गेले असतील. बाकी सगळे डायलॉग स्क्रिप्टमध्ये लिहिले होते. वसंत सबनीस आणि मी एकत्र बसून ती स्क्रिप्ट लिहिली होती. “धनंजय माने इथेच राहतात का?”, हा डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिलेला होता. मी वसंत सबनीसांना तो संपूर्ण प्रसंग करुन दाखवला की हे असं छान दिसेल. त्यावर ते म्हणाले की प्रेक्षक हसतील का? मी हो म्हटलं. ती सगळी सिच्युएशन ठरवून केलेली आहे असं सचिन पिळगावकर यांनी म्हटलं आहे. तसंच “हा माझा बायको पार्वती” हा अशोक सराफ यांचा डायलॉग, “सारखं सारखं काय त्याच झाडावर” हा लक्ष्याच्या तोंडी असलेला डायलॉग मला सुचला होता, तो मी त्याला घ्यायला सांगितला आणि “जाऊबाई, नका ओ जाऊ…” हा लक्ष्याचा डायलॉग तिथे आपसूकच म्हटले गेले होते. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये आधीपासूनच लिहिलेले होते.”, असं एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी म्हटलं आहे.
अशी ही बनवाबनवी सिनेमा सचिन यांनीच केला आहे दिग्दर्शित
सचिन पिळगांवकर हे मराठी सिनेसृष्टीतले एक उत्तम अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट त्यांनीच दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात धनंजय माने (अशोक सराफ) आपल्या मित्रांना सांभाळण्यासाठी जी काही शक्कल लढवतो त्यातून सुधीर (सचिन पिळगांवकर) आणि परशा (लक्ष्मीकांत बेर्डे) यांना स्त्रीचा वेश घ्यावा लागतो. त्या सगळ्यातून काय गंमतीजंमती घडतात आणि धमाल उडते ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाबाबत बोलत असताना सचिन यांनी मी या चित्रपटाचं स्क्रिप्ट वसंत सबनीस यांच्यासह बसून लिहिलं होतं असं म्हटलं आहे.