Saiyaara vs Ye Re Ye Re Paisa 3: मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रिल्समुळे आणि त्यावरील चर्चेमुळे चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. मात्र सैयाराचा फटका मराठी चित्रपटांना बसत असल्याचे समोर आले आहे. सैयाराला स्क्रिनिंग मिळण्यासाठी ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट सिनेगृहातून काढला जात असल्याची बाब समोर आली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत भाष्य केले असून मराठी चित्रपटाची गळचेपी केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
माध्यमांशी बोलत असताना संदीप देशपांडे म्हणाले, “मनसेचे पदाधिकारी अमेय खोपकर यांचा ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यांच्यावर सूड उगविण्यासाठी काही मल्टिप्लेक्स आणि थिएटर्सनी जाणीवपूर्वक त्यांचा चित्रपट काढून घेतला आहे. या सर्व थिएटर्सना आम्ही इशारा देत आहोत. जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची गळचेपी केल्यास मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, याची त्यांनी नोंद घ्यावी.”
अमेय खोपकर मराठी चित्रपटांसाठी लढत होते, यासाठी त्यांच्याच चित्रपटावर सूड उगविण्याचा प्रयत्न काही मल्टिप्लेक्स आणि थिएटरचे मालक करत आहेत. आम्ही त्यांना इशारा देत आहोत. त्यांनी योग्य वेळी थाऱ्यावर यावे, नाहीतर त्यांना थाऱ्यावर कसे आणायचे? हे आम्हाला चांगले ठाऊक आहे, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
संदीप देशपांडे पुढे म्हणाले, कोणतातरी सैयारा नावाचा चित्रपट आला आहे. त्यासाठी मराठी चित्रपटांचा बळी दिला जात आहे. जाणीवपूर्वक जर हे केले जात असेल तर मनसे गप्प बसणार नाही. मराठी सिनेमाच्या निर्मात्याला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत असेल तर मनसे शांत बसणार नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक संपन्न झाली. पक्षबांधणीसंदर्भात सदर बैठक झाल्याचे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले.