रवींद्र पाथरे

तीसेक वर्षांपूर्वी संजय पवार लिखित ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे आरक्षणावर जळजळीत भाष्य करणारं नाटक रंगभूमीवर येऊन गेलं होतं. आता देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली आहेत, पण तरीही जातवास्तवाचं भूत काही आपल्या समाजावरून उतरायला तयार नाही. मधल्या काळात ओबीसींकरता मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या. तेव्हा पुन्हा एकदा देशभर दंगेधोपे उफाळून आले होते. ते थोडेसे थंड होतात- न होतात तोच धनगर, गुज्जर, मराठा आदी जाती-जमातीही आपल्यालादेखील आरक्षण मिळावं म्हणून दंड थोपटून उभ्या ठाकल्या आहेत. आणि त्यांना खोटी आश्वासनं देऊन, न्यायालयात न टिकणारे कायदे करून थंड करता करता राजकारण्यांच्या नाकी नऊ आले आहेत. जसजसा समाज उत्क्रांत होत जाईल तसतशी आरक्षणाची निकड कमी होत जाईल, आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान, वाढते शहरीकरण आणि नागरीकरणाने समाजातील जातीपातींतले भेद, त्याचे कंगोरे बोथट होतील अशी अपेक्षा होती. पण संगणक, डिजिटल वगैरे क्रांत्या होऊनही जातवास्तव तसंच कायम राहिलं आहे. उलट, त्याने अधिकच उग्र रूप धारण केलं आहे. त्यात स्वार्थांध राजकीय पुढारी आणखीनच तेल ओतत असल्याने आणि सगळ्या निवडणुकाही जातीपातींवरच लढवल्या जात असल्याने हे वास्तव नजीकच्या काळात बदलणार नाही, हे नक्की. मग यावर उपाय काय? तर सत्तेचे छोटे छोटे तुकडे जातीपातीच्या पुढाऱ्यांच्या तोंडावर फेकून त्यांना गप्प बसवलं जातं. तेही मिळेल तो तुकडा चघळत मग गप्प बसतात. आपल्याला सत्ता मिळाली म्हणजे समाजाला न्याय मिळाला अशी सोयीस्कर समजूत करून घेतात. पण अशांना राम मंदिर किंवा नव्या संसदेच्या उद्घाटनाला मात्र ठरवून बोलावलं जात नाही. आणि याचंही त्यांना काही वाटत नाही. उन्नावसारख्या घटना घडत असताना ते डोळ्यांवर कातडं पांघरूण बसतात. त्यांची किंमत सत्ताधाऱ्यांनी पुरती जोखलेली आहे.

दुसरीकडे सामाजिक समरसतेचा डिंडिम मिरवत काहींना आपल्याबरोबर घेतल्याचं ‘नाटक’ जोरजोरात ढोल पिटून केलं जातं. पण त्यांना बरोबरीचं स्थान मात्र दिलं जात नाही. नकोसे असतील तेव्हा त्यांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं. आता तर हिंदुत्ववादाचा नवा बागुलबुवा उभा केला जात आहे. ज्यांना कधी आपल्या धर्माचं मानलं गेलं नाही, अस्पृश्य म्हणून ज्यांचं शतकानुशतकं कायम शोषण केलं गेलं, त्यांना हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून जातवास्तवाकडे त्यांनी काणाडोळा करावा आणि हिंदुत्वाच्या उन्मादात त्यांनीही सामील व्हावं.

हेही वाचा >>> अंधश्रद्धेचा खेळखंडोबा

तर… संजय पवार यांचं ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे नाटक हेच जातवास्तव अत्यंत भेदकपणे मांडतं. तीस वर्षांपूर्वीच्या नाटकातील आशयात काडीमात्रही बदल झालेला दिसत नाही. आजही हे नाटक समकालीन वास्तव मांडणारंच वाटतं. नव्हे, ते तसंच आहे. नाटकात प्रचलित जातवास्तव बदलण्यासाठी सरकार कायदा करून प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एका मागासवर्गीयाला ठेवून घेण्याचं फर्मान काढतं आणि समाजात एकच गदारोळ माजतो. नाइलाज म्हणून एखादा मागास तरुण-तरुणी घरात ठेवायला लोक राजी होतातही, पण त्यातल्या त्यात ‘बरा’ माणूस शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करू लागतो. कमलाकर आराध्ये यांच्या घरात त्यामुळे उभी फूट पडते. त्यांचा मुलगा सुदर्शन आणि पत्नी विमला यांना हे बिलकूल पसंत नसतं. आपल्या घरात कुठला कोण परका- तोही खालच्या जातीतला माणूस येऊन राहणार. त्याची संस्कृती, त्याची घडण आपल्याला सहन करावी लागणार. त्याला सांभाळून, सामावून घ्यावं लागणार. त्यापायी आपल्याकडच्या सोवळ्याओवळ्याला धक्का बसणार. त्यामुळे त्यांना हे मान्यच नसतं मुळी. तर कमलाकर आणि त्यांची मुलगी सुकन्या यांना असा कुणी मागास तरुण/ तरुणी आपल्याकडे ठेवण्यात फार काही गैर वाटत नाही. सुकन्या असा एक मागास तरुण (कचऱ्या धीवर) उपलब्ध यादीतून शोधून आणते. तर आराध्यांच्या शेजारीण नाडकर्णीबाई एका आदिवासी तरुणाला (टोरा) घरी घेऊन येतात; जेणेकरून त्याच्या अंगभूत कलांचा आपल्याला ‘धंदा’ करता येईल आणि त्याचा आपल्याला फायदाच होईल असा त्यांचा हिशेब असतो.

कचऱ्याच्या नावापासूनच आराध्यांच्या घरात पहिला संघर्ष उभा राहतो. शेवटी त्याचं नाव ‘कच’ ठेवण्यात येतं. त्याचा दगडाचा देव देवघरात ठेवण्यालाही कडाडून विरोध होतो. सुदर्शन तर सरकारच्या या कायद्यालाच न्यायालयात आव्हान देतो. त्याचं म्हणणं- ‘आम्ही यांना आरक्षण दिलंय ना. त्यांच्याशी जमवून घेतोय ना. मग आता आणखीन हे झंझट कशाला?’ कचाला अगदी नाइलाजानं घरात सामावून घेतलं जातं. सुदर्शन आणि विमला त्याच्या प्रत्येक गोष्टीला नाकं मुरडतात. सुदर्शन तर उठसूठ त्याच्याशी वाद घालतो. कचही त्याला तोडीस तोड उत्तरं देऊन निरुत्तर करतो. कमलाकर आराध्ये आणि सुकन्या मात्र त्याला बरोबरीनं वागवण्याचा प्रयत्न करतात. सुकन्या तर चक्क त्याच्या प्रेमातच पडते. त्यामुळे घरात एकच कल्ला माजतो. कचला घरात घेतलं इथपर्यंत ठीक; पण सुकन्यानं त्याच्याशी लगभन करण्यापर्यंत मजल मारावी? कचलाही हे झेपणारं नसतं. तो तिला या निर्णयापासून परावृत्त करण्याचा आपल्या परीनं प्रयत्न करतो. पण तिचा निर्धार झालेला असतो. आपली पुढची पिढी कुठल्या एका जातीधर्माची नसेल, तर ती ‘माणूस’ असेल, या निर्णयाप्रत शेवटी ते येतात.

लेखक संजय पवार यांनी समाजातील जातवास्तवाचा हा उभा-आडवा छेद अत्यंत आक्रमक पद्धतीनं घेतला आहे. ठसठशीत व्यक्तिरेखाटने तसंच प्रसंगचित्रणाने हा विषय त्यांनी थेट ऐरणीवर आणला आहे. जातनिहाय वास्तवाचे ताणेबाणे इतक्या सखोलतेनं त्यांनी मांडले आहेत, की ते नाकारणे कुणालाही जड जावं. दिग्दर्शक सुबोध पंडे यांनी यातला तीव्र धारदार आशय सादरीकरणातून त्याच प्रकर्षानं पोहोचवला आहे. पात्रांचे ‘बिझनेस’, त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती याचा सखोल अभ्यास त्यातून जाणवतो. प्रत्येक पात्राचं वेगळेपण त्यांनी त्याच्या त्याच्या भाषेतून, वागण्या-बोलण्यातून आणि वृत्ती-प्रवृत्तीतून साकारलं आहे.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी आराध्येंचं छान टापटिपीचं घर तपशिलांत उभं केलं आहे. अजित परब यांनी संगीतातून नाटकातील आशय अधिक ठळक होईल याची दक्षता घेतली आहे. शीतल तळपदे यांनी प्रसंगानुकूल प्रकाशयोजनेद्वारे नाट्यात्म प्रसंग अधोरेखित केले आहेत. मंगल केंकरे (वेशभूषा) आणि किरण शिंदे (रंगभूषा) यांनी आपापली कामगिरी चोख बजावली आहे.

अचूक पात्रनिवडीत या नाटकाचं अर्धंअधिक यश सामावलं आहे. कमलाकर आराध्येंच्या भूमिकेत स्वत: सुबोध पंडे यांनी संयमित व्यक्तिमत्त्वाचा, नितळ विचारधारेचा आणि स्वच्छ भूमिकेचा कुटुंबप्रमुख नेमकेपणाने उभा केला आहे. प्रागतिक विचारांची, वास्तवाला थेट भिडणारी सुकन्या- प्रिया मराठे यांनी आपल्या वागण्या-वावरण्यातून समूर्त केली आहे. अनिकेत विश्वासराव तळागाळातील शोषित माणसाचं प्रातिनिधिक दर्शन तर घडवतातच, पण त्याचा व्यवस्थेवरचा रागही कचऱ्याच्या भूमिकेत थेटपणे व्यक्त करतात. त्यांचं वरकरणी बेछुट वागणं, बोलणं, तितकाच धारदार युक्तिवाद यांतून त्यांचं व्यक्तिमत्त्व ठाशीवपणे उभं राहतं. राहुल पेठे यांनी सनातनी विचारांचा, त्यासाठी कोणत्याही टोकाला जाणारा, तडकभडक सुदर्शन आपल्या अवघ्या देहबोलीतून साकारला आहे. सोवळंओवळं, कुळाचार, जातपात मानणारी आणि ते कसोशीनं जपणारी परंपरागत स्त्री विमला आराध्ये सूक्ष्मपणे टिपलीय संयोगिता भावे यांनी. सोसायटीतील उचापतखोर नाडकर्णीबाई पल्लवी वाघ-केळकर यांनी अतिशयोक्त उक्ती-कृतींतून नीटसपणे वठवली आहे. मागास, आदिवासी तरुणाला घरात आश्रय द्यायच्या सरकारच्या कायद्याचा पुरेपूर फायदा कसा उठवता येईल हे नाडकर्णीबाई हिशेबीपणे पाहतात. त्यासाठी प्रसंगी आपलं सनातनित्व बाजूला ठेवावं लागलं तरी चालेल अशी त्यांची भूमिका असते.

जातवास्तवाचा हा लख्ख आरसा अनेकांना आपलं भगभगीत रूपडं दाखवील यात शंकाच नाही.