एकात दोन वेगळ्या गोष्टी कोंबण्याचा प्रयत्न केला तर तो सगळाच गोळा होतो. त्यातल्या एकाही वस्तूला वा गोष्टीला न्याय मिळत नाही. असा काहीसा प्रकार सोहम पी. शाह दिग्दर्शित ‘करतम भुगतम’ या चित्रपटाच्या बाबतीत झाला आहे. सफाईदार मांडणी आणि काहीसा रहस्यमय शैलीत मांडण्याचा प्रयत्न यामुळे चित्रपट काही प्रमाणात लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतो.

केवळ धार्मिक प्रथांवर नव्हे तर कुठल्याही गोष्टीवर वा व्यक्तींवरचा आंधळा विश्वास तुमची मोठी फसगत करू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे असं आपल्याला सुरुवातीच्या काही मिनिटांत जाणवतं. मात्र एका टप्प्यावर हा चित्रपट त्याच्या शीर्षकावर ‘करतम भुगतम’ या वाक्यावर अडकतो. आणि पूर्ण कथा ते सिद्ध करण्याच्या दृष्टीने फिरते. अंधश्रद्धा आणि जसं कर्म कराल तसं फळ मिळेल या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्या एकाच कथेत बांधायच्या तर त्यासाठी तितकीच दमदार कथा हवी. वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर सोपस्कार करून त्यांनी पाठी ठेवलेल्या सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यासाठी देव न्यूझीलंडहून भारतात भोपाळमध्ये येतो. भोपाळमध्ये आल्यानंतर मित्राच्या मदतीने कामं पूर्ण करत असताना त्याची गाठ अण्णा नामक ज्योतिषाशी होते. तू न्यूझीलंडला परत जाऊ शकणार नाही, असं अण्णा त्याला सांगतो. एकीकडे अण्णाने सांगितलेल्या या गोष्टीची अनामिक भीती त्याच्या मनाचा ताबा घेते. दुसरीकडे त्याची सगळीच कामं अडकून पडतात आणि मग अण्णाची भविष्यवाणी खरी होणार ही भीती त्याला पोखरायला लागते. या सगळ्यातून त्याचा अण्णावरचा आणि त्याच्या कुटुंबीयांवरचा विश्वास वाढू लागतो. पंधरा दिवसांसाठी भारतात आलेला देव कित्येक महिने उलटले तरी परतला नाही म्हणून त्याची प्रेयसी त्याच्या शोधात भारतात येते. आणि देवला स्किझोफ्रेनिया झाला आहे, असं तिला कळतं. खरोखरच देवला मानसिक आजार होतो का? अण्णाची भविष्यवाणी खरी ठरते का? या प्रश्नांचा वेध घेत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न ‘करतम भुगतम’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
puneri pati viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
heeramandi fame actress sanjeeda shaikh opens up on woman groped her
“माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”
Heart-touching Letters to Son from father
Photo: “प्रेम ही एक क्षणिक भावना” प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र; नक्की वाचा

हेही वाचा >>> ‘चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे हेच यश’

चित्रपटाच्या उत्तरार्धात कथा खऱ्या अर्थाने वेग घेते. मात्र पूर्वार्धातली गोष्ट आणि उत्तरार्धात त्याचं मांडलेलं समीकरण पटणारं नाही. देव हा अगदी धार्मिक नाही किंवा सतत बाबा-ज्योतिषी यांच्याकडे जाणाराही नाही. तो तर्काने चालणारा आहे. तरीही त्याच्याबरोबर इतक्या हुशारीने खेळ खेळला जातो की कधीही ज्योतिषाच्या वाट्याला न गेलेला देव पूर्णपणे त्याच्यावर विसंबून प्रत्येक काम करू लागतो. सकाळ-संध्याकाळ देवाची पूजाअर्चा करतो. ज्योतिष सांगणाऱ्या अण्णाच्या शब्दाबरहुकूम वागू लागतो. या सगळ्या प्रक्रियेत देवचं काय होणार, याची कुणकुण आपल्याला लागली असते. मात्र तरीही उत्तरार्धाची सुरुवात करताना स्किझोफ्रेनिया या आजाराचं कुबड देवच्या कथेला लावलं जातं. त्याच्या पुढची चित्रपट संपेपर्यंतची गोष्ट ही वाईट कर्म करणाऱ्यांचं कसं वाईट होतं हे दाखवण्यात घालवली आहे. अंधश्रद्धेतून झालेली फसवणूक हा विषय घेऊन बेतलेला चित्रपट देवची गोष्ट सांगतो की अण्णाच्या कुटुंबाची गोष्ट लोकांनी लक्षात घ्यावी असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे हा गोंधळ काही कळत नाही. मात्र उत्तरार्ध हा अण्णाच्या गोष्टीचा आहे आणि तो त्याच्या कुटुंबाच्या गोष्टीवरच संपतो. पूर्वार्धात गळाठलेला देव उत्तरार्धात हुशार नायक म्हणून समोर येतो. बाकी वाइटावरचा विजय वगैरे नित्याच्या बॉलीवूडी शैलीतली कथा आहेच.

‘करतम भुगतम’ या चित्रपटाचा सगळा डोलारा दोन पात्रांवर आहे. एक म्हणजे देव जोशी. देवची भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे याने केली आहे. मुळात श्रेयसला हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहणं ही मोठी पर्वणी आहे. श्रेयसनेही त्याच्या सहजशैलीत देवच्या भूमिकेतील विविध कंगोरे चपखलपणे साकारले आहेत. आधीचा गोंधळलेला देव आणि नंतर आपल्याबरोबर काय घडलं आहे याची कल्पना आल्यानंतरचा देव ही त्याची दोन्ही रूपं त्याने सहजतेने साकारली आहेत. दुसरी त्याला टक्कर देणारी भूमिका आहे ती अण्णाची. अण्णाची भूमिका अभिनेता विजय राज यांनी केली आहे. अण्णाच्या व्यक्तिमत्त्वातला रुबाब, त्याची देहबोली यासाठी विजय राज यांनी चित्रपटाच्या सुरुवातीपासून पकडलेला सूर शेवटपर्यंत कायम ठेवला आहे. ज्योतिष-तंत्रमंत्रात रमलेल्या अण्णाची गोष्ट पूर्णपणे बदलल्यानंतरही त्याचं खंबीर व्यक्तिमत्त्व शेवटपर्यंत विजय राज यांनी धरून ठेवलं आहे. अण्णा आणि देव यांच्यात काही चमकदार प्रसंग पाहायला मिळायला हवे होते, ती जुगलबंदी अधिक रंगतदार ठरली असती, मात्र तशी संधी या चित्रपटात मिळत नाही. अभिनेत्री मधु शाह खूप दिवसांनी रुपेरी पडद्यावर काम करताना दिसली आहे. तिने तिच्या भूमिकेला न्याय दिला आहे. बाकी गाणी आणि पार्श्वसंगीताच्या बाबतीत चित्रपट यथातथाच आहे. ‘करतम भुगतम’ हे चित्रपटाच्या शेवटी येणारं बादशाहाचं गाणं तेवढं बरं जमलं आहे. एक वेगळी कथा मांडताना तंत्रावर-मांडणीवर अधिक मेहनत घेत गोष्ट शैलीदार करणं दिग्दर्शक सोहम शाह यांना सहजशक्य होतं. मात्र त्याऐवजी गोष्टीनुसार जाण्याचा, कथेला वळण देण्याचा बॉलीवूडपटांचा परिचित फॉर्म्युला स्वीकारल्याने चित्रपटाचा प्रभाव हवा तसा जाणवत नाही.

करतम भुगतम

दिग्दर्शक – सोहम पी. शाह

कलाकार – श्रेयस तळपदे, विजय राज, मधू शाह, अक्षा पारदासानी.