सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर कलाविश्वात सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची चर्चा होत असते. अनेक स्टारकिड्सने त्यांच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण केलं आहे. या स्टारकिड्सच्या यादीत आता अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचं नावदेखील जोडलं गेलं आहे. सोहम लवकरच एका मालिकेच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे.

आदेश बांदेकर निर्मित ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून सोहम बांदेकर मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. या मालिकेत सोहम पोलिसांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. सोहमची ही पहिलीच मालिका असून त्याला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

‘नवे लक्ष्य’ ही मालिका महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे.

“आपले कर्तव्यदक्ष पोलीस आणि त्यांच्या डिपार्टमेंटची गोष्ट सांगताना आम्हाला अभिमान वाटतोय. काय कस लागतो, काय हुशारी लागते आणि कसे तुम्हाला सतर्क रहाण्यास मदत होईल हे या नवे लक्ष्यमधून उलगडेल. ही मालिका पहाताना आपल्या पाठीशी भावा-बहिणीप्रमाणे खंबीरपणे आपलं महाराष्ट्र पोलिसांचं डिपार्टमेण्ट उभं आहे याची जाणीव होईल,” असं सतीश राजवाडे म्हणाले. दरम्यान, आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनअंतर्गत या मालिकेची निर्मिती होत असून ही मालिका ७ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.