अंतिम फेरीत क्रमांक पटकावयाचाच, असा निर्धार करून पुण्यात प्रयोग सादर करत असताना रंगमंचावरच हृदयविकाराचा झटका आल्याने अभिनेता सागर चौगुले यांचा काल मृत्यू झाला. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रयोग सुरू असतानाच हा प्रकार घडला. यानंतर तत्काळ त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना यश आले नाही. या साऱ्या अनपेक्षित प्रकाराने कलाकारांनी हॉस्पिटल परिसरातच हंबरडा फोडला. सागर यांच्या पश्चात आई, एक भाऊ, वहिनी, पत्नी आणि दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

सागर आणि त्यांची मुलगी नारायणी

दरम्यान, सागर यांचे सहकारी मित्र कपिल मुळे यांनी कालच्या घटनेबद्दल एक पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. मुळचे कोल्हापूरचे असलेले सागर काल “अग्निदिव्य’ या नाटकाच्या अंतिम फेरीसाठी पुण्याला गेले होते. या निर्धाराने ही टीम गेली महिनाभर कसून सराव करीत होती. कपिल यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहलेय की, उशीरा येणे ही सागरची सवय सगळ्यांनाच माहित होती. आजही तो सगळ्यात उशीरा आला होता. त्यावरून सा-यांनीच त्याची जाम खेचली. पण सागरने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझे सगळ्यांच्या आधी आवरले होते पण मी मुद्दाम उशीरा आलोय कारण मी अंबाबाईला जाऊन आलोय हे त्याने स्पष्ट शब्दांत सगळ्यांना सुनावले. नंतरही सागर रौप्यची पार्टी शिल्लक आहे म्हणून डिवचले पण यावेळी तो नेहमीच्या शैलीत फक्त हसला.

कपिल मुळे यांची पोस्ट

कालची घटना
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ५६ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातून हृदयस्पर्श हौशी नाट्य संस्थेच्या ‘अग्निदिव्य’ या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. काळम्मावाडीच्या हनुमान नाट्य संस्थेच्या सहकार्याने हे नाटक सादर झाले. प्राथमिक फेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी चौगुले यांना अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले. अंतिम फेरीत बाजी मारायचीच, या निर्धाराने ही टीम गेली महिनाभर कसून सराव करीत होती. पुण्याला जाण्यापूर्वी गेल्याच आठवड्यात या नाटकाचा सदिच्छा प्रयोगही केशवराव भोसले नाट्यगृहात झाला होता. कोल्हापुरातील बहुतांशी सर्वच कला संस्था आणि सेवाभावी व्यक्तिंनी या नाटकाला शुभेच्छांचे पाठबळही दिले. काल सकाळी पन्नासहून अधिक कलाकार-तंत्रज्ञांची टीम पुण्याला रवाना झाली होती. रात्री आठ वाजता प्रयोग सुरू झाला. प्रयोग सुरू झाल्याची अपडेटस्‌ सोशल मीडियावरही पडली. पण, नाटकातील दोन प्रवेश झाले आणि चौगुले यांना रंगमंचावरच चक्कर आल्याचे सहकलाकाराच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ओरडून सर्वांना हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण, काही काळ काहीच समजत नव्हते. अखेर घडलेला प्रकार सर्वांच्याच लक्षात आल्यानंतर चौगुले यांच्यावर प्रयोगाला उपस्थित असणाऱ्या काही डॉक्‍टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले आणि त्यांना तत्काळ रूग्णालयात हलवले. सागर चौगुले हे प्रसिध्द पार्श्‍वगायक सुरेश वाडकर यांचे भाचे होते. त्यांचे वडिल मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून परिचित होते.

‘अग्निदिव्य’ नाटकातील शाहू महाराजांच्या भूमिकेत सागर चौगुले.