पु. ल. देशपांडेंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’नं साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकांत घराघरांतल्या मराठी मनांवर अक्षरश: गारुड केलं होतं. तो काळच तसा होता. मूल्यांसाठी जगणं, त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणं तेव्हा मोलाचं मानलं जात होतं. समाजमानसात स्वातंत्र्योत्तर काळातील निरागस भाबडेपणा काही अंशी शिल्लक होता. अशा भाबडेपणातून किंवा एखाद्या गोष्टीवरील टोकाच्या निष्ठेतूनच ‘वल्ली’ ही प्रजाती निपजत असते. आज काळ पूर्णपणे बदललाय. माणसं नको इतकी व्यवहारी आणि स्वकेंद्री झालेली आहेत. ‘वल्ली’पणाला त्यात बिलकूल स्थान उरलेलं नाही. अशांची गणना आता मूर्खातच होते. तरीसुद्धा माणसाच्या
या पाश्र्वभूमीवर पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’तील काही वल्ली सांप्रत पुनश्च रंगभूमीवर अवतरल्या आहेत. काही वर्षांमागे रत्नाकर मतकरींनी या ‘वल्लीं’ना नाटय़रूपात गुंफून रंगमंचावर सोडलं होतं. चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांना आकार-उकार आणि प्रत्यक्ष व्यक्तित्व बहाल केलं होतं. तेच ‘व्यक्ती आणि वल्ली’ आता पुन्हा सुयोग, अश्वमी आणि अद्वैत या संस्थांच्या सहयोगानं रसिकांच्या भेटीला आलेलं आहे. नव्या रूपातलं ‘वल्ली’ पाहताना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते, ती म्हणजे- काळानं या वल्लींनाही आज आपल्या कवेत घेतलं आहे. या ‘वल्ली’ही ‘स्ट्रीट स्मार्ट’ झाल्या आहेत. याचं कारण त्या सादर करणारे बहुतेक कलाकार आज स्व-वलयांकित आहेत. त्यांच्या नावाभोवतीच्या वलयाचा लाभ या ‘वल्लीं’ना मिळाला असला आणि या कलावंतांनी ‘पुल’कृत व्यक्तींचं ‘वल्ली’पण बाह्य़ात्कारी जरी शत-प्रतिशत साकारलं असलं तरी सर्वानाच ते साकारत असलेल्या वल्लीच्या अंतरंगात प्रवेश मिळालाय असं घडलेलं नाही. म्हणजे पुलंनी कागदावर उतरवलेली ‘वल्ली’ ते अत्यंत चोखपणे वठवतातही; परंतु त्यांच्या ‘वल्ली’पणामुळे त्यांच्या एकूणच आयुष्याला चिकटलेलं अपरिहार्यतेचं, कारुण्याचं अस्तर सगळ्यांना तंतोतंत गवसलंय असं म्हणता येत नाही. याला अंतू बरवा साकारणारे वैभव मांगले आणि सूत्रधार लेखकाच्या भूमिकेतले आनंद इंगळे हे दोघेजण अपवाद! इतरांचं ‘ग्लॅमर कोशंट’ ते साकारत असलेल्या वल्लींच्या सच्चेपणाला प्रभावित करतं. त्यामुळे या नाटकात पुलंच्या ‘वल्ली’ त्या काळातील सगळ्या संदर्भासह सदेह आपल्या भेटीला येत असल्या तरी त्या आपला पुरता कब्जा मात्र घेत नाहीत.
आणखीनही एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे- पुलंना या व्यक्ती संपूर्णपणे नाही तरी काही अंशी का होईना, कुठे ना कुठे भेटल्याच असणार. त्या पूर्णत: काल्पनिक असणं शक्य नाही. (जरी पुलं कितीही म्हणत असले की, या वल्ली मला प्रत्यक्षात भेटल्या तर मी त्यांना कडकडून मिठी मारेन!) परंतु त्यांचं वल्लीपण रंगवताना पुलंनी त्यांच्यावर आपली म्हणून काहीएक लेखकीय ‘कारागिरी’ केलेली आज प्रकर्षांनं जाणवते. या ‘वल्ली’ रेखाटताना त्यामागचे पुलंचे ठोकताळेही ध्यानी येतात. त्यामुळे यातल्या काही वल्लींच्या वल्लीपणात काहीशी कृत्रिमता जाणवते. कधी अतिशयोक्तीपायी, तर कधी ती ‘वल्ली’ चितारण्यातल्या हिशेबीपणामुळे ती आलीय. हे आत्ताच जाणवण्याचं कारण कदाचित असंही असू शकेल, की आज आपण तितकेसे भाबडे अन् निरागस राहिलेलो नाही. इथे प्रकाश नारायण संतांच्या लंपनच्या भावविश्वाची आणि त्यांनी रेखाटलेल्या लंपनच्या सभोवतालातील व्यक्तींची आठवण येते. लंपनच्या विश्वातली ती माणसं आज कदाचित कुठंच आढळणार नाहीत; परंतु त्यांच्याबद्दल वाचताना ती आजही तितकीच खरी वाटतात. (पुलंच्या ‘वल्ली’ आणि संतांच्या लंपनच्या भावविश्वातील व्यक्ती यांची ही तुलना कदाचित अप्रस्तुतही असेल; परंतु ती मनात आली खरी.) असो.
‘व्यक्ती आणि वल्ली’चा प्रयोग अर्थातच उत्तम होतो. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी पुलंच्या प्रत्येक ‘वल्ली’ला स्वत:चा असा ठोस चेहरा आणि व्यक्तित्व दिलेलं आहे. यातल्या व्यक्ती ज्या पर्यावरणात निर्माण झाल्या, त्या देश-काल-परिस्थितीचे तत्कालिन संदर्भही प्रयोगात यथार्थतेनं येतील याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली आहे. सर्वसाधारणत: ज्या कलावंताचं व्यक्तिमत्त्व त्या ‘वल्ली’शी काही अंशी मेळ खातं, त्यानुरूप त्यांनी पात्रयोजना केली आहे. सुनील बर्वे (नाथा कामत), महेश मांजरेकर (बबडू), विकास पाटील (सखाराम गटणे), संदीप पाठक (नारायण), विद्याधर जोशी (बापू काणे), वैभव मांगले (अंतू बरवा), भालचंद्र कदम (नामू परीट), समीर चौघुले (परोपकारी गंपू), राजन भिसे (हरीतात्या) आणि दस्तुरखुद्द पुलंच्या भूमिकेत आनंद इंगळे. या पात्रयोजनेवरून नुसती नजर फिरवली तरी याचा प्रत्यय यावा. वैजयंती चिटणीस बऱ्याच खंडानंतर यात लेखकाच्या आईच्या भूमिकेत दिसल्या आहेत. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी छोटय़ा छोटय़ा भूमिकांतले अन्य कलाकारही चपखल निवडले आहेत.
एका सूत्रात गुंफलेल्या या वल्ली एकापाठोपाठ एक रंगमंचावर अवतरतात, आपलं वल्लीपण पेश करतात आणि अंतर्धान पावतात. लग्नाच्या गोंधळघाईत राब राब राबणारा नारायण त्या क्षणी प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. परंतु त्याच्याकडून आपलं काम झालं की नंतर मात्र त्याची कुणालाच आठवण राहत नाही. त्यालाही अर्थात याचा ना खेद, ना खंत. हे जरी खरं असलं तरी नारायणच्या आयुष्याला असलेली ही कारुण्याची झालर संदीप पाठकांच्या नारायणात त्या तीव्रतेनं येत नाही. तीच गोष्ट नाथा कामतची. त्याचा गुलछबूपणा सुनील बर्वेच्या बोलण्यातून येतो खरा; परंतु त्यामागचा अव्यक्त ‘दर्द’ मात्र प्रेक्षकांच्या काळजाला स्पर्श करीत नाही. महेश मांजरेकरांनी साकारलेल्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या बबडूची व्यथाही अशीच पृष्ठपातळीवर राहते. भालचंद्र कदमांचा नामू परीट ‘स्ट्रीट स्मार्ट’ वाटतो. तीच गोष्ट समीर चौघुलेंच्या परोपकारी गंपूचीही. विकास पाटील यांनी मात्र सखाराम गटणेचं अर्कचित्र छान उभं केलं आहे. इतिहासातच सदैव जगणारे हरीतात्या- राजन भिसे यांनी रंगवले आहेत. आयुष्याच्या शेवटीचं त्यांचं आपण संदर्भहीन झाल्याचं दु:ख वगळता इतिहासानं झपाटलेलं त्यांचं व्यक्तित्व आपल्या मनावर पाहिजे तितकं ठसत नाही. विद्याधर जोशींचा ‘संस्था’कारणी बापू काणे फक्कड जमलाय. सर्वात हृदयस्पर्शी आहे तो अंतू बरवा. वैभव मांगलेंनी अंतू बरव्याची शोकांतिका देहबोलीसकट मुद्राभिनयातून अप्रतिम व्यक्त केली आहे. आणि हा सर्व गोतावळा जमवणारे लेखक भाऊ साकारले आहेत आनंद इंगळे यांनी. पुलंचं व्यक्तिमत्त्व बरंचसं त्यांनी आत्मगत केलंय. कुठंही अति होऊ न देता आपणच निर्माण केलेल्या पात्रांप्रती सहानुभाव दर्शवीत त्यांना बोलतं करणारे, त्यांचं वल्लीपण सामोरं आणणारे लेखक भाऊ आनंद इंगळे यांनी त्यांचा उचित आब राखून उभे केले आहेत. स्वनिर्मित पात्रांमधलं गुंतलेपण आणि त्यांच्या भल्याबुऱ्या कृत्यांचे साक्षीदार असलेल्या लेखकाच्या मनातील भावकल्लोळ इंगळे यांनी संयतपणे, परंतु प्रत्ययकारीतेनं दर्शविले आहेत. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’तल्या प्रत्येक वल्लीशी प्रेक्षकांचं/वाचकांचं जिव्हाळ्याचं नातं असल्यानं त्यांना असं सदेह अनुभवताना ‘गेले ते दिन गेले’ची हुरहुर मनात दाटून येते. अशी माणसं आज दुर्मीळ झाली आहेत याबद्दलचा विषादही त्यात मिसळलेला असतो. परंतु का कुणास ठाऊक, आज पुलंच्या या वल्लींशी आपलं गहिरं नातं मात्र निर्माण होत नाही. बहुधा काळाचा हा महिमा असावा. किंवा मग यातल्या कलावंतांचं ग्लॅमर त्यांचं वल्लीपण साकारण्यात आड आलं असावं.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2014 रोजी प्रकाशित
वलयांकित ‘वल्ली’
पु. ल. देशपांडेंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’नं साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकांत घराघरांतल्या मराठी मनांवर अक्षरश: गारुड केलं होतं.

First published on: 23-03-2014 at 06:59 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi theatre vyakti ani valli by p l deshpande