अभ्यासात आपण कितीही हुशार असलो तरी अनेकजणांचा गणितात मात्र डब्बा गुल होऊन जातो. असेच काहीसे अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्यासोबतही झालेय. गोंधळलात ना.. स्वरा काही पुन्हा शाळेत शिकायला गेलेली नाही. तर तिला रुपेरी पडद्यावरील आपल्या भूमिकेसाठी शाळेत जावे लागलेय. तिचा ‘डब्बा गुल’ झालाय तो आगामी ‘निल बाते सन्नाटा’ या चित्रपटात.
स्वरा भास्कर हिचा आगामी चित्रपट ‘निल बाते सन्नाटा’ मधील ‘डब्बा गुल’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे शब्द ‘मॅथ्स मैं डब्बा गुल’ असे आहेत. रोहन विनायक यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे असून नितेश तिवारी यांनी याचे शब्दलेखन केले आहे. गणित शिकताना सामोरे जावे लागणा-या आव्हानांना यात धमाल आणि गमतीदार रूप देण्यात आले आहे. आई आणि मुलीचे भावविश्व दाखविण्यात आलेला ‘निल बाते सन्नाटा’ हा चित्रपट स्त्रीशिक्षणावर आधारित आहे. स्वराव्यतिरीक्त यात रत्ना पाठक आणि पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट म्हणजे ‘अम्मा कनक्कू’ या तमीळ चित्रपटाचा रिमेक आहे.