‘गुरु-राधिका-शनाया’ या त्रयीने महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गाला अक्षरशः वेड लावले आहे. सध्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बरीच लोकप्रिय आहे. गुरु, राधिका आणि शनायाची अफलातून केमिस्ट्री आणि प्रत्येक एपिसोडगणिक रंगत जाणारं मालिकेचं कथानक हे त्याच्या यशाचं गुपित आहे. आता हे कथानक नागपूरच्या एका ‘रोमांचक’ वळणावर आलंय.

वाचा : मुक्ता बर्वेचं नवं नाटक ‘ढाई अक्षर प्रेम के’

अथर्वच्या मुंजीसाठी आपलं बिऱ्हाड घेऊन गुरुनाथ नागपूर गाठणार आहे. गुरुनाथला सोडलं तर राधिका आणि इतर सुभेदार कुटुंबाला तसंच मित्रपरिवाराला मुंजीच्या कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे. गुरुनाथचं मन मात्र शनायासाठी मुंबईतच अडकलंय. फक्त सोपस्कार म्हणून गुरुनाथ मुंजीतले विधी पार पाडणार आहे. गुरूला भुलवण्यासाठी शनायाने राधिकासारखं वागण्याचा असफल प्रयत्न करून पाहिला. आपण राधिकासारखे दिसू शकतो पण बनू शकत नाही हे तिला कळून चुकलं! ‘गुरु’कृपेसाठी शनायाची चाललेली धडपड आता तिला एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे. राधिका आणि शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरू आजवर अनेकदा तोंडघशी पडला आहे. आता वडिलांच्या संपत्तीचा हव्यास गुरूला आणि गुरूवर आपली जादू चावलणाऱ्या शनायाला नागपूरपर्यंत घेऊन येणार आहे. आजपर्यंत गुरूने मोठ्या चलाखीने शनाया प्रकरण आपल्या आई-बाबांपासून लपवून ठेवलं होतं, पण अथर्वच्या मुंजीत शनायाच्या अचानक आगमनाने गुरुनाथची दाणादाण उडणार आहे. शनायाच्या येण्याने मुंजीच्या कार्यक्रमाची सांगता ‘धक्कादायक’ होणार आहे.

वाचा : सई-शरदची जोडी जमली रे!

अथर्वच्या मुंजीत आता गुरुची ‘उत्तरपूजा’ बांधली जाईल. राधिकाला मुलीसमान मानणाऱ्या गुरूच्या वडिलांकडून गुरुला ‘महाप्रसाद’ मिळणार आहे. गुरूच्या कर्मांचा ‘जागर’ अथर्वच्या मुंजीत ‘गोंधळ’ घालेल का?  गुरुचे ‘डोहाळे’ लागलेल्या शनायाची राधिका ‘पंचारती’ करेल का? गुरुनाथचे वडील त्याला प्रॉपर्टीमधून बेदखल करतील का? गुरु आणि शनायाला धडा शिकवण्यासाठी आता राधिका कोणतं पाऊल उचलेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये मिळणार आहेत.