अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट वेगळ्या विषयामुळे बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. या चित्रपटाच्या शिरपेचात आता मानाचा तुरा खोवला गेला आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या बिल गेट्स यांनी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. या चित्रपटाविषयी प्रशंसा करणारे ट्विट करत गेट्स यांनी अनेकांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बिल गेट्स यांनी ट्विटरच्या माध्यमातून खिलाडी कुमारच्या चित्रपटाविषयी केलेले ट्विट अनेकांसाठीच अभिमानास्पद गोष्ट असेल यात वाद नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१७ मध्ये संपादन केलेले यश आणि काही महत्त्वाच्या उपक्रमांविषयी ट्विट करतानाच त्यांनी खिलाडी कुमारच्या चित्रपटांचा मुद्दा मांडला. भारतात स्वच्छता मोहीमेविषयी जनजागृती करण्याचे काम या चित्रपटातून करण्यात आले आहे, असे ट्विट त्यांनी केले. ग्रामीण भागांमध्ये स्वच्छता आणि त्याच्याशी निगडीत काही समजुतींवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले होते.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

श्री नारायण सिंग दिग्दर्शित या चित्रपटातून अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली होती. प्रेक्षकांसोबतच राजकीय वर्तुळातही या चित्रपटाला बरीच लोकप्रियता मिळाली होती. २०१७ या वर्षात काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये खिलाडी कुमारच्या या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून केला जात आहे. विविध भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देणाऱ्या खिलाडी कुमारने ‘टॉयलेट…’मध्ये साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली होती. त्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने अक्षय कुमारसाठी फार महत्त्वाचा ठरला असे म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft founder bill gates praises bollywood actor akshay kumars movie toilet ek prem katha