बॉलिवूड गायक मिका सिंग सध्या अमेरिकेत होत असलेल्या हमारा पाकिस्तान कॉन्सर्टवरून वादात अडकला आहे. मिकाने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. त्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना, ‘चला भारत आणि ‘आपल्या पाकिस्तान’चा स्वातंत्र्य दिवस एकत्र साजरा करूया’, असे म्हणताना दिसतो. त्याच्या या वक्तव्यावरून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, ट्विटरवर त्याला ट्रोल केले जाते आहे. अनेक ट्विटरकरांनी त्याला कडक शब्दांत सुनावले आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी मिकाला खुले आव्हान दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी जोधपुर न्यायालयात हजर राहणार सलमान खान

१२ ऑगस्टला ह्युस्टनमध्ये मिकाचा शो होणार आहे. शोच्या आधी मिकाने व्हिडिओ शेअर करत भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना एकत्र येऊन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचे आवाहन केले. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत शोचा पाकिस्तानी प्रमोटरही होता. जसा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला त्या क्षणापासूनच मिकावर जोरदार टीका करण्यास सुरूवात झाली.

सीमेवर पाकिस्तानकडून रोज हल्ले होत असतात, त्यात अनेक भारतीय जवान शहीद होत असताना मिकाचा हा व्हिडिओ आला. त्यामुळे लोकांनी तो राग मिकावर काढायला सुरूवात केली. तर चित्रपट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मिकाला महाराष्ट्रात आता माईकही धरु देणार नाही असे स्पष्ट सांगितले.

अमेय यांनी ट्विटवरून ही धमकी देत म्हटले की, ‘सध्या मिका अमेरिकेत ‘हमारा पाकिस्तान’ हा कॉन्सर्ट करतोय. मी त्याला खुलं आव्हान देतो की त्याने आता महाराष्ट्रात माईक तरी पकडून दाखवावा.’

खोपकर यांच्या या ट्विटवर मिकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही ‘रईस’ सिनेमाविरोधात मनसेने जोरदार निदर्शने केली होती. ‘रईस’ सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान असल्यामुळे या सिनेमाला मनसेकडून विरोध केला गेला होता. तसेच गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असल्यामुळे करणला सिनेमा प्रदर्शित करु दिला जाणार नाही असेही म्हटले होते. पण त्यानंतर करण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सिनेमा प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mika singh saying humara pakistan mns leader amey khopkar threatens mika to sing in maharashtra