Munawar Faruqui स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी हा कायमच त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. स्टॅन्ड अप कॉमेडी करताना क्राऊड नावाचा एक प्रकार केला जातो. ज्यात समोरच्या उपस्थितांना प्रश्न विचारायचे आणि टायमिंगने जोक साधायचे. असाच एक जोक मुनव्वर फारुकीला महाग पडला आहे. त्याने मराठी माणसाचा अपमान केला. मात्र मनसेने त्याला चांगलाच हिसका दाखवला ज्यानंतर त्याने आता माफी मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडलं होतं मुंबईतल्या शोमध्ये?

मुनव्वर फारुकीने ( Munawar Faruqui ) त्याच्या मुंबईत आयोजित स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना विचारलं की “तुम्ही सर्वजण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातूनच आलेले आहात का? तुमच्यापैकी कोणी लांब राहतं का? कोणी लांबचा प्रवास करून इथे आलंय का?” त्यावर प्रेक्षकांमधून कोणीतरी होकारार्थी उत्तर दिलं. त्यावर फारुकीने विचारलं, “कुठून आलात?” त्यावर समोरून उत्तर आलं, “तळोजा, मुंबईबाहेरून आलोय”. यावर फारुकी म्हणाला, “हे लोक आज सांगतायत की प्रवास करून आलोय, अन्यथा यांचे गाववाले लोक यांना विचारतात, कुठे राहता? तेव्हा हेच लोक त्यांच्या गाववाल्यांना सांगतात, मुंबईत राहतो. हे कोकणी लोक सगळ्यांना *** बनवतात.” मुनव्वर फारुकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यानंतर मनसे आणि भाजपाने त्याला फटके पडतील असा इशाराच दिला. हे सगळं झाल्यावर आता मुनव्वर फारुकीने ( Munawar Faruqui ) माफी मागितली आहे.

मनसेच्या दणक्यानंतर मुनव्वर फारुकीचा माफीनामा, त्याने व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. (फोटो-मुनव्वर फारुकी फेसबुक पेज)

मुनव्वर फारुकीचा माफीनामा

“हाय दोस्तांनो, मी आज या व्हिडीओतून काही गोष्टी स्पष्ट करायला आलो आहे. मी एक शो केला त्यामध्ये मी क्राऊड वर्क म्हणजेच लोकांशी संवाद साधत होतो. त्यात कोकणाचा विषय निघाला. तळोजामध्ये कोकणी लोक राहतात मला ठाऊक आहे. कारण माझे अनेक मित्र तिथे राहतात. मात्र जे बोललो ते जरा संदर्भ सोडून झालं. मी कोकणाची खिल्ली उडवली असं अनेकांना वाटलं. मात्र माझा तो हेतू मुळीच नव्हता. मी आत्ताही तेच सांगू इच्छितो की क्राऊड वर्कमध्ये मी बोलून गेलो. मात्र मी पाहिलं की लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी कॉमेडियन आहे. माझं काम लोकांना हसवणं आहे दुखवणं नाही. त्यामुळे मी मनापासून जे दुखावले गेलेत त्यांची माफी मागतो. सॉरी माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या मी त्यांची माफी मागतो. इंटरनेटवर जोक व्हायरल झाला आहे. मात्र मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र” असं म्हणत मुनव्वरने ( Munawar Faruqui ) माफी मागितली आहे.

‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये वडापाव गर्लसह झळकणार ‘ही’ लोकप्रिय इन्फ्लुएन्सर, मुनव्वर फारुकीशी होते खास संबंध

नितेश राणे काय म्हणाले?

भाजपा आमदार नितेश राणेंनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याबाबत त्यांनी असंही म्हटलं आहे की मुनव्वर फारुकी ( Munawar Faruqui ) फटके खाण्याआधी सरळ झाला. यापुढे मराठी माणूस, कोकणी माणूस किंवा हिंदूंबाबत काही बोललास तर थेट अॅक्शन होईल.

मुनव्वर फारुकी कोण आहे?

मुनव्वर फारुकी ( Munawar Faruqui ) हा एक कॉमेडियन व रॅपर म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनेक कविता, किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस’च्या आधी मुनव्वरने ‘लॉकअप’च्या पहिल्या सिझनच्या विजेतेपदावर नाव कोरलं होतं. तेव्हापासून लोकप्रिय झाला. त्याच्या जन्म २८ जानेवारी १९९२ रोजी गुजरातमधील जुनागडमध्ये झाला. आईच्या निधनानंतर तो मुंबईला आला. २०२० मध्ये मुनव्वरच्या वडिलांचं निधन झालं. दरम्यान, ‘दाऊद, यमराज औरत’ या म्युजिक व्हिडीओमुळे त्याला करिअरमध्ये खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munawar faruqui apologizes over his statement about konkani people scj