प्रेक्षकांच्या मागणीनुसार रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दूरदर्शन वाहिनीवर दाखवण्यात येत आहे. मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. तसेच मालिकेतील प्रभू रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल, लक्ष्मणाची भूमिका साकारणे सुनील लहरी, सीतेच्या भूमिकेतील दीपिका अशी अनेक पात्र पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पण रामानंद सागर यांच्या रामायणात एक अभिनेता असा आहे ज्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्याने कधी ऋषींची भूमिका साकारली आहे तर कधी सेनापती. अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या या मुस्लीम कलाकाराला रामायणाने लोकप्रियता मिळवून दिली होती. आज त्याच्या भूमिकेची वाह.. वाह.. केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अभिनेत्याचे नाव आहे असलम खान. त्यांनी रामायणात अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांनी समुद्र देवाची भूमिका साकारली होती. त्यानंतर सीतेच्या स्वयंवरात भजन गायक म्हणून ते दिसले होते. तसेच राजा दशरथाच्या सेनेमध्ये देखील ते दिसले होते.

असलम यांनी विक्रम वेताळ या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. नंतर त्यांनी रामायण मालिकेत काम केले. रामायण मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘श्री कृष्णा’, ‘सूर्यपुत्र’, ‘मशाल’ आणि ‘हवाए’ या मालिकांमध्ये काम केले होते. पण २००२ साली त्यांनी हवी तशी भूमिका मिळत नसल्यामुळे अभिनयाच्या प्रवासाला पूर्ण विराम लावला. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा असलम यांची चर्चा सुरु आहे. नुकताच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी ‘सोशल मीडियावर माझ्यावर मीम्स तयार केले जात आहेत हे मला लोकांकडून कळालं. त्यावेळी सोशल मीडिया आणि फोन असते तर मी एक लोकप्रिय अभिनेता झालो असतो. मला चांगल्या भूमिका मिळाल्या असत्या’ असे त्यांनी म्हटले.

असलम खान यांचा जन्म १९६१ साली उत्तर प्रदेशमध्ये झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण मुंबईमध्ये झाले. मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी त्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्या वडिलांना असलमने मुंबई दुसरी एखादी चांगली नोकरी करावी असे वाटत होते. २००२मध्ये त्यांनी अभिनयाच्या प्रवासाला पूर्णविराम दिला. आता ते उत्तर प्रदेशच्या झाशी येथे राहत आहेत. त्यांना दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim actor aslam khan played several roles ramanand sagars ramayan avb