प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पापमार्गाने न जाता अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीला साद घातली तर जगण्याचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो असा संदेश डॉ. सुयश शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मयत’ हा लघुपट देऊन जातो. अलीकडेच ‘मयत’ लघुपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जयपूर फिल्म फेस्टिवल मध्ये देखील इंटरनॅशनल पॅनोरमा विभागात सादर होणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘मयत’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट स्क्रिप्टचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
ही कथा आहे एका खेड्यात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या नामदेव याची. मोलमजुरी करण्यासाठी अनेक ठिकाणी चकरा मारूनही त्याला काम मिळत नाही. घरात खायला अन्नाचा कण नाही. अशा परिस्थितीत त्याला मयताच्या अंतयात्रेच्यावेळी टाकण्यात येणारे पैसे गोळा करण्यातून उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होते. अशी वेगळे कथाबीज घेऊन सुयश शिंदे यांनी ही कथा पडद्यावर फुलवली आहे.
या लघुचित्रपटाबद्दल बोलताना सुयश शिंदे म्हणाले, ”मयत’ लघुपट हा पूर्णपणे व्यावसायिक सेटअप वापरून तयार केलेला आहे. जवळपास दीड वर्षांपासून ‘मयत’ लघुपटावर काम चालू होते. सर्वसाधारणपणे कोणताही लघुचित्रपट तत्कालीन समस्येवर सामाजिक संदेश देतो. त्यामधून लोकजागृती करणे हा उद्देश असतो. मात्र या संकल्पनेला छेद देत मी प्रेक्षकांना माझ्या चित्रपटातून तात्विक संदेश देण्याचे ठरवले. त्यामुळे ‘मयत’ हा लघुपट प्रेक्षकांना अंतर्मुख करून जगण्याचे तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. या लघुचित्रपटाच्या स्क्रिप्टवर पाच-सहा महिने काम चालू होते. या लघुचित्रपटाच्या लोकेशनसाठी सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रवास करून चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी लोकेशन निवडण्यात आली. या लघुपटाचे सलग सहा दिवस चित्रीकरण सुरु होते. चित्रीकरणासाठी स्थानिक गावकऱ्यांनी देखील खूप सहकार्य केले.’
वाचा : ‘हिचकी’मध्ये झळकणार होता ‘तो’; मात्र ऐनवेळी राणीने मारली बाजी
नामदेवची भूमिका केलेल्या कैलास वाघमारे यांनी आपल्या भावमुद्रेवरून ही भूमिका जिवंत केली आहे. मीनाक्षी राठोड यांनी त्याच्या पत्नीची भूमिका समरसून केली आहे. इतर भूमिकांमध्ये नामदेवची मुलगी (सुरभी) आणि अन्य कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेला दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे यांचा हा सलग तिसरा लघुचित्रपट. आगामी काळात एक डार्क कॉमेडी असलेला लघुचित्रपट बनविण्याचा डॉ. शिंदे यांचा मानस आहे.