आंतरराष्ट्रीय चित्रपटकर्मी आणि दक्षिण आशियाई चित्रपटकर्मी यांना एकाच व्यासपीठावर आणत सिनेमाची देवाणघेवाण करण्याची संधी देणारा ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चा ‘फिल्म बझार’ या वर्षी नव्या स्वरूपात दाखल होणार आहे. उत्तम चित्रपट निर्मितीसाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याच्या उद्दिष्टाने भरवण्यात येणाऱ्या या ‘फिल्म बझार’मधून बाहेर पडलेल्या ‘तितली’, अविनाश अरुण यांचा ‘किला’, शोनाली बोसचा ‘मार्गारिटा, विथ स्ट्रॉ’ या चित्रपटांनी या वर्षी विविध आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवले आहेत. या वर्षी उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हायवे’, रीमा बोरा यांचा ‘बोकुल’, मानव कौलचा ‘तथागत’सारख्या चित्रपटांना ‘फिल्म बझार’च्या नव्या विभागात स्थान मिळाले आहे.
‘फिल्म बझार’ येत्या २० नोव्हेंबरपासून गोव्यातील मॅरिऑट रिसॉर्ट येथे भरवण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या बझारमध्ये या वर्षी ‘फिल्म ऑफिसेस’, ‘इन्व्हेस्टर पिच’ आणि ‘रोमान्स स्क्रीनराइटर्स लॅब’ असे तीन नवीन विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ‘एनएफडीसी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘फिल्म ऑफिसेस’ या विभागांतर्गत त्या त्या राज्यातील किंवा देशातील पर्यटन विभागाला आणि चित्रपट विभागाशी संबंधित प्रतिनिधींना त्यांची कार्यालये थाटता येतील. बझारला भेट देणारे चित्रपटकर्मी या कार्यालयांना भेट देतील आणि त्यांच्यात चित्रपट निर्मितीसंदर्भातली देवाण-घेवाण होईल. ‘इन्व्हेस्टर पिच’ हा विभाग दोन स्तरांवर कार्यरत असणार आहे. पहिल्या सत्रात ‘रोमँटिक कथा’ शैलीतील चित्रपटांसाठी लिहिलेल्या पटकथांची निवड केली जाणार आहे. पटकथा निवडीचे काम प्रसिद्ध दिग्दर्शक हबीब फैझल, पटकथाकार भवानी अय्यर आणि ‘काकस्पर्श’सारख्या चित्रपटाची पटकथा लिहिणारे गिरीश जोशी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या स्तरावर ज्यांना चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक मदतीची गरज आहे अशा चित्रपटांचा विचार करण्यात येणार आहे, तर ‘रोमान्स स्क्रीनराइटर्स लॅब’ अंतर्गत रोमँटिक आणि स्त्रीप्रधान पटकथा विकसित करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
याशिवाय, ‘फिल्म बझार’मध्ये ‘वर्क इन प्रोग्रेस लॅब’ भरवण्यात येते. यात चित्रपटकर्मी आपल्या चित्रपटाचा रफ कट आंतरराष्ट्रीय चित्रपटकर्मीचा समावेश असलेल्या समितीला दाखवतात. समिती संबंधित दिग्दर्शकाशी रफ कट पाहून चर्चा करते आणि मग त्यातून चित्रपट पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शकाला जी मदत लागेल ती द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जातो. आत्तापर्यंत एनएफडीसीने ‘तितली’, ‘किला’, ‘शीप ऑफ थिसस’, ‘मिस लव्हली’, ‘द गुड रोड’ आणि ‘बी. ए. पास’सारख्या चित्रपटांना मदत के ली आहे. या वर्षी या विभागात उमेश कुलकर्णी यांचा ‘हायवे’, रीमा बोरा दिग्दर्शित ‘बोकूल’, अश्विनी अय्यर तिवारी यांचा ‘द गुड फॉर नथिंग’, मानव कौलचा ‘तथागत’ आणि राम रेड्डी यांच्या ‘थिथी’ची निवड झाली आहे. लघुपटांनाही या लॅबअंतर्गत मदत केली जाणार आहे. ‘एनएफडीसी’ हे चित्रपटांना आर्थिक मदत करण्यासाठी नाही, मात्र चित्रपटकर्मीना दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी लागणारे साहित्य एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2014 रोजी प्रकाशित
एनएफडीसीच्या ‘फिल्म बझार’चे नवे स्वरूप
आंतरराष्ट्रीय चित्रपटकर्मी आणि दक्षिण आशियाई चित्रपटकर्मी यांना एकाच व्यासपीठावर आणत सिनेमाची देवाणघेवाण करण्याची संधी देणारा ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चा ‘फिल्म बझार’ या वर्षी नव्या स्वरूपात दाखल होणार आहे.
First published on: 12-11-2014 at 05:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New look of nfdc film bazaar