गेल्या काही काळापासून कलाविश्वामध्ये वेब मालिकांची संख्या वाढत आहे. हिंदी, इंग्लिश या वेब मालिकांमध्ये आता मराठी सीरिजदेखील दिसून लागल्या आहेत. ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या सीरिजनंतर लवकरच आणखी एक मराठी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘यू टर्न’ असं या आगामी सीरिजचं नाव असून सायली संजीव या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेम म्हणजे समजली तर भावना ठेवला तर विश्वास मांडला तर खेळ आणि निभावलं तर वचन. याच प्रेमाची एक नवीन ओळख करून देण्यासाठी राजश्री मराठीची ‘यू टर्न’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून राजश्री मराठी पहिल्यांदाच वेबविश्वात पदार्पण करणार आहे.

‘यू टर्न’ म्हटले की पटकन डोळ्यांसमोर येतो गाडीतून फिरताना मारला जाणारा ‘यू टर्न’. मात्र हा यू टर्न जरा वेगळा आहे. आता ‘यू टर्न’ नक्की कोणता? कोणाचा? कशासाठी? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला ही वेबसीरिज पाहिल्यावर मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव ही नवीकोरी जोडी स्क्रीन शेअर करणार असून पहिल्यांदाच हे दोघे एकमेकांसोबत काम करणार आहेत. या सीरिजची निर्मिती नेहा बडजात्या करत आहेत. तर दिग्दर्शनाची धूरा मयुरेश जोशी यांनी स्वीकारली आहे.

तूर्तास या वेबसीरिजचा एका व्हिडिओद्वारे डिजिटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तीस सेकंदाच्या या व्हिडीओत ओमप्रकाश आणि सायली दिसत असून दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत आहेत. या वेबसीरिजमध्ये काय पाहायला मिळणार यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New marathi web series u turn sayali sanjiv and omprakasha shinde ssj