अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या मोडलेल्या विवाहाची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली होती. त्यावरून अनेक तर्क-वितर्क देखील लावले जाऊ लागले होते. अखेर खुद्द नुसरत जहाँ यांनीच या प्रकरणावर खुलासा केला आहे. यासाठी त्यांनी ७ मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणारं जाहीर निवेदनच काढलं असून त्यामध्ये त्यांनी “निखिल जैनसोबत झालेला विवाह हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने अवैध होता”, असा खुलासा केला आहे. तसेच, हा विवाह तुर्की कायद्यानुसार करण्यात आला होता, त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध आहे, असं देखील त्या म्हणाल्या आहेत. ७ मुद्द्यांच्या आधारे केलेल्या स्पष्टीकरणामध्ये नुसरत जहाँ यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर दावे केले आहेत.

ते तर फक्त लिव्ह-इन रिलेशनशिप!

आपल्या विवाहासंदर्भात नुसरत जहाँ या निवेदनात म्हणतात, “आमचं लग्न तुर्की कायद्यानुसार झालं होतं. ते भारतीय विशेष विवाह कायद्यानुसार वैध होणं आवश्यक होतं. पण ते झालं नाही. इथल्या कायद्यानुसार ते लग्न नव्हतं, तर फक्त एक नातं किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप होतं. त्यामुळे औपचारिक घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही. आम्ही फार पूर्वीच वेगळे झालो आहोत. फक्त मी त्यावर भाष्य टाळलं होतं. त्यामुळे माझ्या कृतीवर कुणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही”, असं नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केलं आहे.

माझ्या परवानगीशिवाय पैशांचा वापर!

दरम्यान, नुसरत जहाँ यांनी आपल्या पैशांचा आपल्या परवानगीशिवाय वापर होत असल्याचा आरोप केला आहे. “जे स्वत: श्रीमंत असल्याचा दावा करत आहेत (निखिल जैन), त्यांनीच माझ्या बँक खात्यामधून अवैधरीत्या पैसे काढले आहेत. आम्ही वेगळे झाल्यानंतर देखील हा प्रकार सुरूच होता. यासंदर्भात मी बँकेकडे तक्रार केली असून पोलिसात देखील लवकरच तक्रार केली जाणार आहे”, असं नुसरत जहाँ यांनी निवेदनात म्हटलं आहे.

 

निवेदन जाहीर करण्याआधी नुसरत जहाँ यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक सूचक पोस्ट देखील केली होती. “तोंड बंद ठेऊ शकणारी महिला म्हणून मला इतिहास ओळखणार नाही. आणि माझी त्याला काहीही हरकत नाही”, असं या पोस्टमध्ये नुसरत जहाँ म्हणाल्या आहेत.

 

माझे दागिनेही त्याच्याकडेच!

या स्पष्टीकरणात्मक निवेदनामध्ये नुसरत जहाँ यांनी निखिल जैन याच्यावर अनेक आरोप केले आहेत. “मला लग्नावेळी माझ्या कुटुंबियांनी दिलेले दागिने, माझ्या स्वत:च्या कमाईतून घेतलेले दागिने, माझे कपडे, बॅग्ज आणि इतर गोष्टी त्याने त्याच्याकडेच ठेऊन घेतल्या आहेत”, असं नुसरत जहाँ यांनी या खुलाशामध्ये म्हटलं आहे.

 

चुकीच्या व्यक्तीला प्रश्न विचारू नका!

“माझा संबंध नसलेल्या कुणाबाबतही किंवा माध्या वैयक्तिक आयुष्याबाबत मी बोलणार नाही. माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की माझ्याशी बऱ्याच काळापासून संबंधित नसललेल्या व्यक्तीला तुम्ही काहीही प्रश्न विचारू नका. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी एका व्यक्तीला हिरो करून एकतर्फी माहिती देणं अपेक्षित नाही. अशा व्यक्तींना अनावश्यक प्रसिद्धी देऊ नये अशी मी माध्यमांना विनंती करते”, असं देखील नुसरत जहाँ यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

अभिनेत्री नुसरत जहाँच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा!

नुसरत यांनी २०१९मध्ये उद्योजक निखिल जैनशी लग्न केले होते. त्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. पण गेल्या सहा महिन्यांपासून नुसरत आणि निखिल यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकंच नव्हे तर नुसरत या एसओएस कोलकता चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्याही चर्चा होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे यशने म्हटले होते.