The Great Indian Kapil Show Promo: ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आधीचे दोन सीझन प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर आता या शोचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिल शर्माने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. इतकंच नाही तर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आहे, तोही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

Navjot Singh Sidhu Comeback In The Great Indian Kapil Show: कपिल शर्माचा हा शो आधीच्या दोन पर्वाप्रमाणेच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. नव्या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. कारण या शोमध्ये एक जुनाच सदस्य पुन्हा परततोय. होय. नवज्योतसिंग सिद्धू ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पुन्हा दिसणार आहेत. तिसऱ्या सीझनचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, यात सिद्धूंच्या एंट्रीनंतर अर्चना पूरन सिंहची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे.

नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि एक्स अकाउंटवरून ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत नवज्योतसिंग सिद्धू शोमध्ये परतत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा प्रोमो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘एक कुर्सी पाजी के लिए प्लीज… हर फनीवार बधेगा हमारा परिवार, नवज्योतसिंग सिद्धू और अर्चना पूरन सिंह की वापसी के साथ’. कपिल शर्माचा शो २१ जूनपासून रात्री ८ वाजता फक्त नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

पाहा प्रोमो

प्रोमोवरून तरी नवज्योतसिंग सिद्धू व अर्चना पूरन सिंह हे दोघेही शोमध्ये दिसतील असं वाटतंय. दोघांनाही शोमध्ये ठेवण्यासाठी शोच्या रूपरेषेत नेमके काय बदल करण्यात आले आहेत, ते शो प्रसारित झाल्यावरच कळेल.

६ वर्षांनी नवज्योतसिंग सिद्धूंचं पुनरागमन

नवज्योतसिंग सिद्धू ६ वर्षांनी कपिल शर्मा शोमध्ये परतणार आहेत. त्यांना पुन्हा शोमध्ये पाहणे हे चाहत्यांसाठी पर्वणी आहे. ते शोमध्ये कधी परतणार? असे प्रश्न बरेचदा चाहते विचारायचे. कपिल अनेक वेळा विनोद करताना शोमध्ये सिद्धू परतणार असं म्हणाला होता. दरम्यान, पुलवामा हल्ल्याशी संबंधित एका वादग्रस्त विधानानंतर नवज्योतसिंग सिद्धू वादात सापडले होते. त्यांच्या वक्तव्यावरून चांगलीच टीका झाली आणि मग कपिलच्या शोमधून त्यांची एक्झिट झाली. त्यानंतर अर्चना पूरन सिंहने त्यांची जागा घेतली.