OTT November Releases : ओटीटीमुळे आता मनोरंजन अगदी सहज आणि सोपं झालं आहे. प्रेक्षकांना अगदी घरबसल्या जगातील कोणतीही कलाकृती पाहता येते. ओटीटीमुळे आता जगभरातील विविध भाषांतील सीरिज आणि चित्रपट पाहता येतात, त्यामुळे ओटीटीप्रेमी प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला नवनवीन सीरिज आणि चित्रपटांसाठी उत्सुक असतात.

या ओटीटी प्रेक्षकांसाठी हा नोव्हेंबरचा महिना खूपच खास असणार आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच काही लोकप्रिय सीरिज ओटीटीवर दाखल होणार आहेत, त्यामुळे हा महिना मनोरंजनाच्या दृष्टीने खूपच धमाल ठरणार आहे. या महिन्यात तीन गाजलेल्या वेब सीरिजचे नवीन बहुप्रतीक्षित सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जर तुम्हीही या सीरिज पाहण्याचा विचार करत असाल, तर त्यांची नावं आणि प्रदर्शनाच्या तारखा आताच नोंद करून ठेवा…

द फॅमिली मॅन सीझन ३ :

‘द फॅमिली मॅन’च्या आगामी तिसऱ्या सीझनची अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. गेल्या चार वर्षांपासून चाहत्यांना या सीरिजची उत्सुकता लागून राहिली होती आणि या महिन्यात ती उत्सुकता अखेर संपणार आहे. या सीरिजमधून श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासह ओटीटीवर धमाल करायला सज्ज आहे. मनोज बाजपेयी पुन्हा आपल्या या हिट सीरिजमधून लोकांचं मन जिंकणार आहे. येत्या २१ नोव्हेंबरपासून प्राइम व्हिडीओवर ही सीरिज पाहता येणार आहे.

दिल्ली क्राईम सीझन ३ :

डीसीपी वर्तिका चतुर्वेदी पुन्हा एकदा नव्या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी परत येत आहे. शेफाली शाह यांच्या या लोकप्रिय वेबसीरिजचा पहिला सीझन निर्भया प्रकरणावर आधारित होता, तर दुसऱ्या सीझनमध्ये ‘कच्छा-बनियान गॅंग’ची कथा दाखवण्यात आली होती. त्यानंतर आता ‘दिल्ली क्राईम’च्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना मानव तस्करीच्या भीषण जगाचं वास्तव पाहायला मिळणार आहे. येत्या १३ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर ही सीरिज पाहता येणार आहे.

महाराणी सीझन ४ :

‘महाराणी’ सीरिजच्या आगामी चौथ्या सीझनमधून अभिनेत्री हुमा कुरेशी पुन्हा एकदा राणी भारतीच्या दमदार भूमिकेत परत येत आहे. ‘महाराणी’चा चौथा सीझन या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मागील सर्व सीझन्सना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अनेकांना या चौथ्या सीझनची उत्सुकता लागून राहिली होती. ही उत्सुकता आता संपली आहे. येत्या ७ नोव्हेंबर रोजी ही सीरिज सोनी लिव्ह या ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या सीझनमध्ये राणी भारती बिहारच्या राजकारणातून पुढे जात राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करताना दिसेल.

स्ट्रेंजर थिंग्स ५ :

या सुपरहिट सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हा या सीरिजचा अंतिम सीझन असेल आणि त्यानंतर ‘स्ट्रेंजर थिंग्स’ची कथा संपेल, त्यामुळे ‘स्ट्रेंजर थिंग्स’चे अनेक चाहते काहीसे भावूकही झाले आहेत. दरम्यान, ‘स्ट्रेंजर थिंग्स’चा पाचवा सीझन प्रेक्षकांसाठी एका खास सरप्राइजबरोबर येणार आहे. मेकर्सनी तो तीन भागांमध्ये विभागला आहे. यापैकी पहिला भाग येत्या २६ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.