फुलराणी सायना नेहवालचा बायोपिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणात सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी येत राहिल्या. या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाची भूमिका वठविणार होती. मात्र काही कारणास्तव तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर आता या चित्रपटासाठी अभिनेत्री परिणीती चोप्राची निवड करण्यात आली असून सध्या परिणीती बॅडमिंटनाचे धडे घेत आहे. याविषयी परिणीतीने स्वत:माहिती दिली आहे.
‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या दोन चित्रपटांमध्ये व्यग्र असल्यामुळे श्रद्धाने सायनाच्या बायोपिकवर पाणी सोडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर परिणीतीची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली. सध्या कलाविश्वामध्ये बायोपिकचा ट्रेण्ड सुरु असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या आगामी बायोपिकविषयी उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे. मात्र सध्या या बायोपिकसाठी परिणीती बॅटमिंटनचे धडे गिरवत असून ऑक्टोबर महिन्यामध्ये या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) June 13, 2019
दरम्यान, यापूर्वी सायनाच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार होती. यासाठी तिने बॅटमिंटनच्या सरावास सुरुवातदेखील केली होती. मात्र श्रद्धाने अन्य काही चित्रपटांसाठी सुद्धा तारखा दिल्या होत्या. त्यामुळेच तिच्या व्यस्त कामकाजामुळे तिला हा बायोपिक सोडावा लागला.