आनंद गांधी लिखित आणि दिग्दर्शित ‘शीप ऑफ थिसिस’ हा सध्याचा एक वेगळा सिनेमा. तो आपल्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित करतो. आपल्याला विचार करायला भाग पाडतो.
चित्रपट फक्त मनोरंजनात्मक असावा की विचार प्रवर्तकही असावा, असा प्रश्न गेली अनेक वर्षे आपण एकमेकांना नेहमीच विचारत असतो. त्याविषयी ठिकठिकाणी अनेक वैचारिक परिसंवादही आयोजित केले जातात, भले त्यातून काही साध्य होवो अथवा न होवो. पण चित्रपटनिर्मिती ही एक कला आहे आणि या कलेचा आपल्या भारतीय प्रेक्षकांच्या मनावर एक जबरदस्त प्रभाव आहे हे अमान्य करून चालणार नाही. चित्रपटनिर्मिती हा एक व्यवसाय आहे असे जरी मानले तरीही या कलेच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच समाजाचे काही प्रबोधनही व्हावे, त्यातून एक विचार समोर मांडला जावा असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आपल्याकडे आहे. आपल्या चित्रपटसृष्टीला चित्रपटाद्वारे वैचारिक आणि सामाजिक प्रबोधनाचा एक मोठा इतिहासही आहेच. त्या दृष्टीने बघायचं झालं तर भारतीय सिनेमा सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे असं वाटतं. अनेक दिग्दर्शकांचे वेगवेगळे प्रयोग त्यांच्या चित्रपट कलाकृतीद्वारे प्रेक्षकांसमोर येत असले तरी खऱ्या अर्थाने ज्याला आपण विचार प्रवर्तक चित्रपट म्हणतो असे चित्रपट बनविण्याचे धाडस खूप कमी दिग्दर्शक आत्तापर्यंत दाखवू शकले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रदíशत झालेला आनंद गांधी लिखित आणि दिग्दíशत ‘शिप ऑफ थिसिस’ हा चित्रपट पहिला तेव्हा असे वाटले की, दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवताना किती वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे आणि आपल्या कथेतील तात्त्विक विचार अशा पद्धतीनेही प्रेक्षकांसमोर मांडता येऊ शकतात हे दाखवून दिलेले आहे.
एका ग्रीक आख्यायिकेनुसार थिसिस नावाचा एक माणूस होता. त्याने आपले जीर्ण झालेले लाकडी जहाज दुरुस्त करण्याचे ठरवले आणि आपल्या लोकांना सांगितले की, जहाजाचा जो भाग खराब झाला आहे तेवढाच सुटा भाग पूर्णपणे बदलून, तसाच नवा भाग जशाच्या तसा त्या ठिकाणी बसवा. त्याप्रमाणे जहाजाचा जो जो भाग खराब झाला आहे तो तो भाग पूर्णपणे नव्याने बसवण्यात आला. अशाप्रकारे अनेक वर्षांनंतर जहाजाचे सर्वच सुटे भाग बदलण्यात आले आणि त्या ठिकाणी नवीन सुटे भाग लावण्यात आले. असे जहाज जेव्हा थिसिसने पहिले तेव्हा तो म्हणाला की, हे जहाज तुम्ही अतिशय हुबेहूब पद्धतीने दुरुस्त केले आहे पण हे जहाज माझे नव्हे, ह्याचा एकही भाग माझ्या मूळ जहाजाचा नाही, हे एक पूर्णपणे नवे जहाज आहे. या आख्यायिकेवरून असा प्रश्न निर्माण झाला की, एखाद्या वस्तूचे जर सर्व सुटे भाग बदलले तर ती जी नवीन वस्तू तयार होईल ती तीच पूर्वीची वस्तू असेल की तिचे अस्तित्व बदलून ती पूर्णपणे नवीन वस्तू झालेली असेल? हाच प्रश्न मानवाच्या आणि प्रत्येक जीवसृष्टीच्या बाबतीत लागू पडतो. मानवी शरीरातील जुन्या रक्तपेशी जाऊन सातत्याने नव्या रक्तपेशी तयार होत असतात. मानवी शरीर सतत बदलत असते. मग अशा बदललेल्या शरीरातील माणूसही बदललेला असतो का? की तो पूर्वीचा तोच माणूस असतो? आपल्याला पडलेल्या याच प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आनंद गांधी यांनी आपल्या ‘शिप ऑफ थिसिस’ या चित्रपटाद्वारे केला आहे. प्लुटार्क नावाच्या ग्रीक तत्त्ववेत्याने पहिल्यांदा अशा प्रकारच्या विचारांचा अभ्यास केला आणि हे विचार संकलित करून जगासमोर मांडले.
आनंद गांधी यांच्या म्हणण्यानुसार ‘समजा आपण एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण भाग बदलले आणि त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये काही वर्षांनंतर तात्त्विक पातळीवर, मानसिक पातळीवर आणि भावनिक पातळीवर जर काही बदल घडून आले तर तो माणूस काही वर्षांपूर्वीचा तोच माणूस असेल का? आणि जर असेल तर काही वर्षांपूर्वी
आपला विचार मांडण्यासाठी तीन वेगवेगळ्या कथासूत्राची मांडणी दिग्दर्शक आनंद गांधी यांनी आपल्यासमोर केलेली आहे. या तीनही कथा अवयव बदलाच्या एका समान सूत्राने बांधल्या गेल्या आहेत. डोळ्याने अधू असलेल्या पण एक अतिशय उत्कृष्ट फोटोग्राफर असलेल्या अलिया (एईदा अल कासेफ)चा कॉर्निया जेव्हा बदलला जातो, तेव्हा तिच्या लक्षात येते की तिला आता दिसतेय तर खरे पण तरीही आपल्या फोटोग्राफी कलेतील पूर्वीची मजा आता नाहिशी झाली आहे. डोळे असणे म्हणजेच दृष्टी असणे असते का? आणि डोळे नसले म्हणजे माणूस खरेच आंधळा असतो का, असे प्रश्न या कथेतून मांडले जातात. दुसऱ्या कथेमध्ये एक जैन मुनी मत्रेय (नीरज कबी) एका औषध कंपनीच्या विरुद्ध कोर्ट केस लढतोय असे दाखवले आहे, कारण या कंपन्या प्रयोगासाठी प्राण्यांचा वापर करत आहेत असे त्याचे मत असते. पण त्याला जेव्हा लीव्हर कॅन्सर होतो तेव्हा तो आपल लीव्हवर ट्रान्सप्लँट करून घेण्याचे आणि इतर औषध घेण्याचेही नाकारतो. हे त्याच्या तत्त्वाच्या विरुद्ध असते. अशा वेळेस त्याची ही तात्त्विक मते एक तरुण वकील खोडून काढतो आणि स्वत:वर असा अघोरी प्रयोग न करण्याचे सुचवतो. तर तिसऱ्या कथेमध्ये एका स्टॉकब्रोकर नवीनची (सोहम शाह) भेट अचानक शंकर नावाच्या माणसाशी होते. ज्याची किडनी अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या दरम्यान अनधिकृतपणे काढून घेण्यात आलेली असते. शंकरला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने नवीन, ती किडनी ज्या माणसाला बसवलेली असते त्या माणसाच्या शोधात, स्टॉकहोमपर्यंत जाऊन पोहोचतो. नवीनच्या दृष्टीने आपल्या शरीरातील किडनीचे महत्त्व प्रचंड असते, कारण त्याच्या शरीरातही इतर कुणाची तरी किडनी बसवलेली असते. त्यामुळेच तो भावनिकरित्या या विषयात गुंतलेला असतो. अशाप्रकारे तिन्ही पात्र अवयवदानाविषयीची आपली स्वत:चीच तात्त्विक बाजू सतत पडताळून पाहतात आणि त्या दृष्टीने ठोस काही म्हणू पाहतात. या तिन्ही कथा शेवटी एकत्र करून त्यात एक समान धागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे यातील सर्वच कलाकारांनी चित्रपटात अतिशय उत्तम काम केले आहे. खासकरून जैन मुनी झालेला नाटय़ अभिनेता नीरज कबी. एक आजारी जैन मुनी साकारताना या अभिनेत्याने जवळपास १७ किलो वजन कमी केले होते. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अतिशय सुंदर असून याचा बॅकग्राऊंड स्कोअर आपल्याला अतिशय तरल आणि स्पिरिच्युअल अनुभूती देतो. यातील पात्रांच्या संभाषणाचा आशय खूप गंभीर असला तरीही ते समजायला अतिशय सोपे असल्यामुळे पाहताना कंटाळा न येता आपण पूर्ण चित्रपटात शेवटपर्यंत गुंतत जातो.
अशा प्रकारच्या चित्रपटांचे अस्तित्व खरे म्हणजे आपल्याकडे फक्त फेस्टिव्हल सर्किटपुरते मर्यादित असते. अशा चित्रपटांना पुरस्कारही मिळतात, लेखक, दिग्दर्शकाचे खूप कौतुकही होते, पण चित्रपट प्रदíशत होण्यासाठी मात्र त्यांना खूप वाट पाहावी लागते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही त्याला मिळणारा प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले नसल्यास दिग्दर्शकाचा भ्रमनिरास होतो आणि मग आणखी कुणी असे चित्रपट बनवण्यास धजावत नाहीत. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांना योगायोगाने किरण राव यांचे सहकार्य मिळाले त्यामुळे चित्रपटाचे मार्केटिंगही चांगले झाले, चित्रपट लोकांपर्यंत पोहोचू शकला. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे चित्रपटसृष्टीत एक उत्साहवर्धक वातावरण तयार होण्यास मदत झाली आहे. असे चित्रपट प्रेक्षक स्वीकारतात असा विश्वास वितरकांमध्येही निर्माण होणे गरजेचे असते आणि ‘शिप ऑफ थिसिस’च्या निमित्ताने तेच साध्य झाले आहे. या चित्रपटामुळे अजून एक गोष्ट साध्य होण्यास मदत झाली आहे आणि ती म्हणजे अवयवदानाविषयी जनजागृती. नुकतेच आमिर खान आणि किरण राव या दोघांनीही हा चित्रपट पहिल्यानंतर आपण देहदान करण्याबद्दल गंभीर विचार करत असल्याचे म्हटले आहे. अशा चित्रपटांच्या माध्यमातून आपला प्रेक्षक बदलत चालला आहे, तो सुजाण होत आहे याची प्रचीती येत आहे आणि त्याची उत्तमोत्तम गोष्टींची भूकही वाढत चालली आहे हे जास्त महत्त्वाचे. त्यामुळेच दिग्दर्शकाचा हा अत्यंत वेगळा प्रयत्न खरेच यशस्वी झाला आहे असेच म्हणता येईल. अर्थात असा चित्रपट पाहायचा झाल्यास एक वेगळी मानसिकता आणि खुले मन असणे फार गरजेचे आहे. नाहीतर आपल्याला या चित्रपटातील विचारांची अनुभूती घेता येणार नाही. हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या जाणिवा समृद्ध व्हायला मदत तर होतेच पण सोबतच आपला वैश्विक विचारही नक्कीच विस्तारला जातो. कधी विचारही न केलेल्या गोष्टींचा या निमित्ताने आपण नकळतपणे स्वत:च्या पलीकडे जाऊन विचार करायला लागतो आणि त्यामुळे आपले आयुष्य फक्त एकांगी नसून त्याला किती तरी छटा आहेत हे सतत जाणवत राहते. नेहमीच पठडीतले आयुष्य जगताना आपण एका स्वार्थी पद्धतीने जगत असतो, अशा वेळेस हा चित्रपट मात्र आपल्याला नक्कीच स्वत:ला प्रश्न विचारायला भाग पाडतो. त्यामुळे तत्त्वज्ञानाची अशी सांगड आपल्या चित्रपटामध्ये घालता येणे ही गोष्ट यापुढील काळातही लेखक दिग्दर्शकांना जमल्यास भारतीय चित्रपटसृष्टीचा दर्जा आणखी उंचावू शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2013 रोजी प्रकाशित
‘शिप ऑफ थिसिस’ सिनेमातील तत्त्वज्ञान
आनंद गांधी लिखित आणि दिग्दर्शित ‘शीप ऑफ थिसिस’ हा सध्याचा एक वेगळा सिनेमा. तो आपल्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित करतो. आपल्याला विचार करायला भाग पाडतो.
First published on: 27-08-2013 at 08:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Philosophy in ship of theseus