फोटोकॉपी १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या हातात
आपल्या सुरेल आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहा राजपाल आपल्याला आता नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘फोटोकॉपी’ या सिनेमाच्या निमित्ताने निर्मात्याच्या भूमिकेत ती आपल्यासमोर येणार आहेत. नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस  या नवोदित कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहे, तर या दोघांसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. व्हायकॉम इंटरनॅशनल आणि नेहा राजपाल यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात जुळ्या बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. नुकतंच या सिनेमाचं नवंकोरं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.  या सिनेमातील पर्णच्या दोन्ही व्यक्तिरेखांसाठी असलेला लुक आपल्याला या पोस्टरवरून दिसून येतो आहे. तसेच, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुझं माझं सेम असतं’ अशी टॅगलाइनही पोस्टरवर पाहावयास मिळते. या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.  सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत.  मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.