भारतीय पारंपरिक पेहरावात नऊवारी साडीचं स्वत:चं असं स्थान आहे. नऊवारी साडी, त्यावर नथ, पारंपरिक दागिने असा साज कोणत्याही स्त्रीच्या सौंदर्यात लक्षणीय भर लागतो. मात्र हीच सगळी वेशभूषा जर एखाद्या पुरुषाने केली तर? अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकने नऊवारी साडीतील त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोतील प्रसादचं देखणं रुप पाहून नेटकरीसुद्धा भारावले आहेत.
मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देताना प्रसादने स्वत: स्त्री वेशातील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. नऊवारी साडी, नथ, दागिने, मोठी टिकली, केसात माळलेला गजरा.. या सर्व गोष्टी पाहून फोटोत प्रसाद ओक नाही तर जणू एखादी स्त्रीच असल्याचा भास होतो. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘चंद्रमुखी’ अशी कमेंट प्रसादच्या या फोटोवर केली आहे. तर मराठी रंगभूमीची खरी लक्ष्मी असं म्हणत एका नेटकऱ्याने प्रसादचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा : “विकी डोनरमधील आयुषमानचा किसिंग सीन पाहून तळपायाची आग मस्तकात गेली”
प्रसाद ओक इन्स्टाग्रामवर बराच सक्रिय असून अनेक गमतीशीर पोस्ट तो शेअर करत असतो. त्याच्या स्वभावातील विनोद हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्येही आवर्जून दिसून येतो.